इतवारीत भरवस्तीतून विद्याथिर्नीच्या अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:31+5:302021-02-09T04:09:31+5:30
नागपूर : घरासमोर फिरत असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची छेड काढून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न आरोपीच्या अंगलट आला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यामुळे ...

इतवारीत भरवस्तीतून विद्याथिर्नीच्या अपहरणाचा प्रयत्न
नागपूर : घरासमोर फिरत असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची छेड काढून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न आरोपीच्या अंगलट आला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी आरोपीला पकडून त्याची धुलाई केली. ही घटना रविवारी रात्री सेंट्रल एव्हेन्यूच्या गांधी पुतळा चौकाजवळ घडली.
लालू जगदंबाप्रसाद यादव (३१) रा. येरला, कळमेश्वर असे आरोपीचे नाव आहे. २२ वर्षीय युवती अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. ती रात्री १०.३० वाजता भोजन केल्यानंतर घराजवळ फिरत होती. त्यावेळी लालू आपल्या तीन साथीदारांसोबत तेथे आला. तो विद्यार्थिनीच्या मागे कार चालवू लागला. रात्रीची वेळ असल्यामुळे परिसरात नागरिकांची वर्दळ नव्हती. आरोपींच्या हालचाली पाहून विद्यार्थिनीला संशय आला. ती सतर्क होऊन कारकडे पाहत होती. दरम्यान लालू कारमधून उतरून विद्यार्थिनीच्या जवळ गेला. अपहरण करण्याच्या भीतीमुळे विद्यार्थिनीने आरडाओरड केली. त्यावेळी तेथून जात असलेला अंकित हरिदास विद्यार्थिनीच्या मदतीसाठी धावला. त्याने नागरिकांच्या मदतीने लालूला पकडले. नागरिक गोळा झाल्याचे पाहून कारमधील लालूचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. नागरिकांनी लालूला पकडून त्याची धुलाई केली. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लालूला अटक केली. नागरिकांनी वेळीच मदत केल्यामुळे मोठी घटना टळली. लालू आणि त्याचे साथीदार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ते विद्यार्थिनीचे अपहरण करण्याच्या घटनेचा इन्कार करीत आहेत. लालूच्या मते, तो लघुशंकेसाठी कारखाली उतरला होता. त्याच्या साथीदाराच्या शोधासाठी तहसील पोलिसांनी कळमेश्वरसह अनेक ठिकाणी जाळे टाकले आहे. घटनास्थळ दाट लोकवस्तीचा परिसर आहे. तेथे बाहेरील व्यक्ती अशा प्रकारची घटना घडवून आणू शकत नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
..........