गोळीबार प्रकरणातील सत्य लपविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: July 23, 2015 03:02 IST2015-07-23T03:02:03+5:302015-07-23T03:02:03+5:30
जमिनीच्या वादातून प्रॉपर्टी डीलरवर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील सत्य लपविले जात आहे.

गोळीबार प्रकरणातील सत्य लपविण्याचा प्रयत्न
सगीर हत्याकांडाशी संबंध : आरोपींना पोलीस कोठडी
नागपूर : जमिनीच्या वादातून प्रॉपर्टी डीलरवर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील सत्य लपविले जात आहे. या प्रकरणाचे तार कोळशाच्या तस्करीशी जुळले असल्याची माहिती पुढे आली आहे. यात सहभागी असलेली मंडळी ट्रान्सपोर्टर असल्याने याला अधिक बळ मिळत आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कुणीही सत्य सांगायला तयार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान यशोधरानगर पोलिसांनी बुधवारी आरोपी शाहनवाज खान फिरोज खान ऊर्फ आबू आणि राजू ऊर्फ टकल्या शेख याला न्यायालयात सादर करून पोलीस कोठडीत घेतले आहे.
मंगळवारी रात्री प्रॉपर्टी डीलर मुश्ताक अशरफी याच्यावर गोळीबार करून जखमी करण्यात आले होते. प्लॉट दाखविण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून राजूने गोळी चालवल्याचे मुश्ताकने सांगितले होते. मुश्ताकच्या तक्रारीनुसार त्याने शाहनवाज याच्याकडून गोरेवाडा येथे १८ लाख रुपयात प्लॉट खरेदी केला होता. त्यानंतर तो प्लॉट नासुप्रच्या मालकीचा असल्याचे उघडकीस आले. त्याने शाहनवाज याला आपले पैसे परत मागितले. तेव्हापासून आबू या वादात पडला. त्याने मुश्ताकला घरी बोलावून समेट घडवून पैसे देण्यात प्रयत्न केला. परंतु मुश्ताकने १८ लाखापेक्षा एक रुपयाही कमी घेणार नाही, अशी भूमिका घेतली त्यामुळे वाद काही मिटला नाही. मुश्ताकचे म्हणणे आहे की, कामठी रोडवरील जमीन दाखविण्याच्या बहाण्याने ते दोघेही त्याला गाडीत बसवून घेऊन जात होते. या दरम्यान राजूने त्याच्यावर गोळी झाडली. गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. परंतु मुश्ताकने तक्रार नोंदविली नव्हती.
मुश्ताक प्रकरण आणि आठ महिन्यांपूर्वी धरमपेठ येथे कोळसा माफिया सगीर यांच्या खुनाच्या घटनेत कुठलेही अंतर नाही. दोन्ही घटनेत वाहनाच्या आत गोळी चालवण्यात आली. दोन्ही प्रकरणात आबुची भूमिका आहे. सगीरच्या खुनाच्या आरोपात आबूचा भाऊ जाकीर तुरुंगात आहे. सगीरला त्याचा प्रतिस्पर्धी हाजीकडून जीवाचा धोका होता. त्याने खूप अगोदर चंद्रपूर पोलिसांना यासंबंधात सूचित केले होते. सगीरला कोळशाच्या तस्करीत दर महिन्याला एक कोटी रुपयाची कमाई होत होती. त्याच्या प्रेयसीने सुद्धा ही गोष्ट कबूल केली होती. ही कमाई लाटण्यासाठीच सगीरचा खून करण्यात आला होता. सगीर संरक्षणासाठी आबूकडे गेला होता. आबूने सगीर व हाजी यांच्या वादात मध्यस्ती सुद्धा केली होती. त्याचा भाऊ जाकीर नेहमी सगीरसोबत बॉडीगार्ड प्रमाणे राहत होता. नंतर त्यांनीच सगीरचा खून केला. सगीरच्या खुनात सीताबर्डी पोलिसांवर आरोपींना संरक्षण देण्याचे आरोप लागले होते.
सगीरचा खून सुपारी देऊन केल्याचा खुलासा लोकमतने केला होता. यात कोट्यवधीची देवाणघेवाण झाली होती. परंतु त्या खुनाची खरी माहिती समोर आली नाही. सगीरच्या खुनाच्या धर्तीवर मुश्ताकवर करण्यात आलेल्या हल्ल्यामागचे खरे कारण सुद्धा लपविले जात आहे. घटनेच्या खोलात गेल्यावर आरोपींच्या सांगण्यावरही प्रश्न उपस्थित होतात. मुश्ताकला राजूने उजव्या पायाच्या जांघेवर गोळी मारली होती. परंतु मुश्ताकने सांगितल्यानुसार आपला जीव वाचवण्यासाठी तो गोळी लागताच चालत्या गाडीतून बाहेर उतरला होता. घटनास्थळापासून सुमारे अडीच किलोमीटर दूर असलेल्या यशोधरानगर पोलीस स्टेशनपर्यंत तो चालत गेला. गाडीमध्ये आरोपींसोबत मुश्ताक एकटाच होता. अशा परिस्थितीत त्याला सहजपणे कुठेही गोळी मारता आली असती. तेव्हा केवळ जांघेवर गोळी मारल्याची बाब न पटणारी आहे. या सर्व गोष्टींमुळे या प्रकरणामागचे सत्य उघडकीस आणणे आवश्यक झाले आहे. सूत्रांनुसार मुश्ताक आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मुश्ताकचे सोबती एकेकाळी सगीरला कोळशाच्या व्यापारात मदत करीत होते. अशा परिस्थितीत गोळीबारामागे जमिनीच्या वादासोबतच दुसरेही कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)