शेजाऱ्यांनी केला प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST2021-03-17T04:07:40+5:302021-03-17T04:07:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्न ठरलेल्या तरुणीविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आरोपींना हटकले म्हणून त्यांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला ...

शेजाऱ्यांनी केला प्राणघातक हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्न ठरलेल्या तरुणीविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आरोपींना हटकले म्हणून त्यांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात जिशान अली नामक तरुण गंभीर जखमी झाला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा ताजबाग परिसरात सोमवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. शहबाज हनिफ ताजी (वय २२) आणि सुलतान हनिफ ताजी (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत.
मोहम्मद साबिर मोहम्मद सरवर (वय ३५, रा. बहादुरा फाटा) यांच्या भाचीचे साक्षगंध असल्याने ते सोमवारी ताजबागमध्ये राहणाऱ्या बहिणीच्या घरी आले. रात्रीच्या वेळी ते त्यांचे जावई आणि भाच्यासोबत अंगणात गप्पा करीत बसले असताना शेजारी राहणारे आरोपी शहबाज हनिफ ताजी आणि सुलतान हनिफ ताजी हे दोघे भाचीविषयी नको त्या भाषेत मोठमोठ्याने बोलू लागले. साबिर यांनी त्यांना हटकले. त्यानंतर वाद होऊ नये म्हणून ते भाच्यासह बाजूच्या मैदानात गेले. त्यांच्या मागून आरोपी शहबाज आणि सुलतान तलवार घेऊन आले आणि त्यांनी साबिर यांचा भाचा जिशानवर तलवारीने हल्ला चढवला. गळ्याजवळ तलवार लागल्याने जिशान गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी धाव घेऊन आरोपींना आवरले. जखमी जिशानला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. साबिर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी आरोपी शहबाज आणि सुलतानविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
-----