महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:38+5:302021-01-02T04:07:38+5:30
ब्रेकअपमुळे संतप्त युवकाचे कृत्य : गणेशपेठमधील घटना नागपूर : महावितरणच्या सब-स्टेशनमध्ये कार्यरत एका महिला ऑपरेटरवर ब्रेकअप झाल्यामुळे तिच्या मित्राने ...

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर हल्ला
ब्रेकअपमुळे संतप्त युवकाचे कृत्य : गणेशपेठमधील घटना
नागपूर : महावितरणच्या सब-स्टेशनमध्ये कार्यरत एका महिला ऑपरेटरवर ब्रेकअप झाल्यामुळे तिच्या मित्राने हल्ला केला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी तत्परता दाखवून हल्ला करणारा युवक सचिन भरत कांबळे (३८) यास अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले.
गणेशपेठच्या गोदेरेज आनंदम परिसरात महावितरणचे सब-स्टेशन आहे. येथे जखमी युवती ऑपरेटर पदावर कार्यरत आहे. ती पतीपासून वेगळी राहते. सचिन घटस्फोटित आहे. तो मुंबईच्या एका खासगी संस्थेत काम करतो. त्याची फेसबुकवर युवतीसोबत मैत्री झाली. सचिनने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. तो युवतीच्या कुटुंबीयांशी भेटण्यासाठी नागपुरात आला होता. काही कारणामुळे काही दिवसापूर्वी त्यांच्या मैत्रीत कटुता आली. युवतीने सचिनशी बोलणे बंद केले. ती सचिनला फोनवरही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे सचिन संतप्त झाला. त्याने युवतीला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. सचिन एक दिवसापूर्वी नागपुरात पोहोचला. त्याला युवती ड्युटीवर असल्याचे समजले. तो नशेच्या अवस्थेत ५ वाजता सब-स्टेशनला पोहोचला. युवतीला बोलण्यासाठी दबाव टाकत होता. युवतीने नकार दिल्यामुळे तो संतप्त झाला. त्याच्याजवळ चाकू होता. सचिनने युवतीवर चाकूने हल्ला केला. युवतीने हिंमत दाखवून सचिनचा मुकाबला केला. परंतु सचिनने पोट आणि दाताने चावून युवतीला जखमी केले. युवतीची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी सचिनला पकडून त्याची पिटाई केली. गणेशपेठ पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सचिनला अटक केली. त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला. सचिनच्या मते, युवतीने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे त्याने तिच्यावर हल्ला केला. त्याच्याविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..........
सुरक्षा रक्षकांचा अभाव
या घटनेमुळे महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. महावितरणच्या अनेक सब-स्टेशनमध्ये महिला ऑपरेटर तैनात आहेत. बहुतांश सब-स्टेशनवर सुरक्षा रक्षक नसतात. महिला ऑपरेटर एकट्याच ड्युटी करतात. त्यांना अनेकदा त्रास होतो. त्यांनी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी केली आहे.
.............