लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: खर्रा घेण्यास गेलेल्या तरुणाला उधारीचे पैसे मागितले. त्यातून वाद उद्भवून पानटपरीचालकासह त्याच्या तीन मित्रांनी सदर तरुणाला जबर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली. ही घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० डिसेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.विकास वसंत बडवाईक (२५, रा. पारडसिंगा, ता. काटोल) असे जखमीचे नाव आहे. दिनेश रमेश तिजारे (२४, रा. पारडसिंगा) याची गावात पानटपरी आहे. तिथे विकास हा खर्रा घेण्यासाठी जायचा. दिनेशचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिथे उधारीच्या व्यवहारातून खर्रा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्यावर बरीच उधारी झाली होती. अशात तो ३० डिसेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दिनेशच्या पानटपरीवर गेला. त्याने खर्रा मागताच दिनेशने त्याला आधी उधारीचे पैसे देण्यास सांगितले. त्यातूनच वाद उद्भवला. दरम्यान, दिनेशने विशाल भास्कर तिजारे (२८), अजय रमेश तिजारे (३०) आणि विकास ऊर्फ रमेश तिजारे (२३) सर्व रा. पारडसिंगा यांना मोबाईलद्वारे सूचना देऊन घटनास्थळी बोलवून घेतले. या चौघांनी विकासला मारहाण केली. त्यात विकास जखमी झाला. छातीला मुकामार लागल्याने त्याला नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे त्याच्यावर ६ जानेवारीपर्यंत उपचार करण्यात आले.यानंतर विकासने काटोल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तसेच वैद्यकीय रिपोर्ट पोलिसांना प्राप्त होताच याबाबत आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींना काटोल पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक नागुलवार करीत आहेत.
तरुणाला पानटपरीवरील उधारी पडली महागात; नागपूर जिल्ह्यात पारडसिंगा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:43 IST
खर्रा घेण्यास गेलेल्या तरुणाला उधारीचे पैसे मागितले. त्यातून वाद उद्भवून पानटपरीचालकासह त्याच्या तीन मित्रांनी सदर तरुणाला जबर मारहाण केली.
तरुणाला पानटपरीवरील उधारी पडली महागात; नागपूर जिल्ह्यात पारडसिंगा येथील घटना
ठळक मुद्देउधारी थकल्याने पानटपरीचालकाने केली मारहाण