अतिक्रमणविराेधी पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST2021-02-27T04:09:05+5:302021-02-27T04:09:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अतिक्रमणाच्या नावाखाली रोजीरोटीचे साधन घेऊन जाणाऱ्या पथकावर संतप्त हातठेलेवाल्यांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली. ...

अतिक्रमणविराेधी पथकावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिक्रमणाच्या नावाखाली रोजीरोटीचे साधन घेऊन जाणाऱ्या पथकावर संतप्त हातठेलेवाल्यांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली. वाहनाचीही तोडफोड केली. गुरुवार रात्री ८.३० च्या सुमारास नंदनवनमधील केडीके कॉलेजजवळ ही घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, महापालिकेच्या नेहरूनगर झोनचे पथक केडीकेजवळच्या हातठेलेवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी रात्री गेले. त्यांना संबंधित हातठेलेवाल्यांनी कारवाई न करण्याची विनंती केली. मात्र, पथकातील कर्मचाऱ्यांनी एक पानटपरी टिप्परमध्ये टाकली. ते पाहून संतप्त झालेल्या टपरीवाल्यासह कुमार बावणकर, शुभम कोरी आणि त्यांच्या १० ते १२ साथीदारांनी जिप्सी तसेच जेसीबीची तोडफोड केली. कैलास नत्थूजी येणूरकर यांना मारहाण केली. या प्रकारामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवन पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी जमावाला आवरले. संजय काशिराम रेहपाळे (वय ३७, रा. शक्तीमाता नगर) यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
----