अल्पवयीन युवतीवर अत्याचार

By Admin | Updated: August 11, 2016 02:00 IST2016-08-11T02:00:20+5:302016-08-11T02:00:20+5:30

अल्पवयीन युवतीसोबत जबरदस्तीने लग्न करून तिचे शारीरिक शोषण करण्याचे प्रकरण पुढे आले आहे.

Atrocities on a minor maiden | अल्पवयीन युवतीवर अत्याचार

अल्पवयीन युवतीवर अत्याचार

मुलीला दिला जन्म : पती, पित्याला अटक
नागपूर : अल्पवयीन युवतीसोबत जबरदस्तीने लग्न करून तिचे शारीरिक शोषण करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. संबंधित युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या घटनेत या अल्पवयीन युवतीचे सावत्र आईवडिल सामील आहेत. पोलिसांनी तिचे सावत्र आईवडिल आणि पतीला अटक केली आहे.
मनोज राजकुमार घरडे (३२) आणि राजू मेश्राम (५५) रा. कामगारनगर अशी आरोपींची नावे आहेत. राजूची पत्नी माया फरार आहे. लग्नाच्या चार वर्षानंतर ही घटना उजेडात आली. पीडित युवती १७ वर्षांची आहे. तिच्या जन्मानंतर लगेच तिचे आईवडिल मृत्यू पावले. ती मेश्राम दाम्पत्यासह राहत होती. ते तिच्याकडून घरातील कामे करून घेत होते. एप्रिल २०१२ मध्ये ही युवती १२ वर्षाची झाल्यानंतर त्यांनी मनोज घरडे याच्यासोबत तिचे लग्न लावून दिले. या मोबदल्यात त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली. कमी वयात लग्न झाल्यामुळे या युवतीच्या मनावर परिणाम झाला. परंतु काहीच माहिती नसल्यामुळे ती काहीच करू शकली नाही. ती मनोजचा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करीत होती. अशातच २०१४ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर मनोज तिला आणखी त्रास देऊ लागला. मनोज मजुरी करतो. तो या युवतीवर काम करण्याची जबरदस्ती करीत होता.
कमी वयात प्रसुती झाल्यामुळे ती अशक्त झाली होती. त्यामुळे ती मजुरी करण्याचे टाळत होती. त्यामुळे मनोज तिला आणखी त्रास देऊ लागला. तो तिला आणि तिच्या मुलीला जेवणही देत नव्हता. अनेकदा त्याने तिला घराबाहेर काढले. काही दिवसांपूर्वी मनोजने तिला पुन्हा घराबाहेर काढले. युवती फिरत फिरत रेल्वेस्थानकावर पोहोचली. तेथे फिरत असताना ६ आॅगस्टला बाल संरक्षण समितीच्या लोकांची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिची चौकशी केली असता तिने आपबिती सांगितली. समितीचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिला सुधार गृहात नेण्यात आले. तिने दिलेल्या माहितीनुसार ९ आॅगस्टला जरीपटका ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अत्याचाराचा आणि बाल विवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल करून राजु मेश्राम आणि मनोज घरडेला अटक केली.(प्रतिनिधी)

डॉक्टरचाही समावेश
अल्पवयीन युवतीने उत्तर नागपुरात एका खासगी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी तिचे वय १४ वर्षे होते. तिच्या शारीरिक अवस्थेवरून तिच्या वयाची सहज कल्पना येते. परंतु तरीसुद्धा डॉक्टरने याची सूचना पोलिसांना दिली नाही. त्यामुळे यात त्या डॉक्टरचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित युवतीच्या दोन वर्षाच्या मुलीसोबतही आपत्तीजनक व्यवहार केल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोजच्या राक्षसी वृत्तीचा परिचय पोलिसांना आला.
 

Web Title: Atrocities on a minor maiden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.