१३ तासात अट्टल गुन्हेगार जेरबंद
By Admin | Updated: March 12, 2017 02:44 IST2017-03-12T02:44:01+5:302017-03-12T02:44:01+5:30
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसने येताना आऊटरवर अदिती शैलेंद्र सावनसुखा (२४) हिला धक्का देऊन तिची ४० हजाराचा मुद्देमाल असलेली हॅन्डबॅग पळविणाऱ्या आरोपींना

१३ तासात अट्टल गुन्हेगार जेरबंद
रात्रभर जागून लावला छडा : लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
नागपूर : पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसने येताना आऊटरवर अदिती शैलेंद्र सावनसुखा (२४) हिला धक्का देऊन तिची ४० हजाराचा मुद्देमाल असलेली हॅन्डबॅग पळविणाऱ्या आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या १३ तासात जेरबंद करून गजाआड केले. घटनेची नोंद होताच तपासचक्र फिरवून लोहमार्ग पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
मो. इरफान ऊर्फ सोनू मो. इकबाल (२०) रा. अन्सारनगर मोमीनपुरा, मो. आमीर अन्सारी ऊर्फ सोनू मुस्लिम अन्सारी (२४) रा. वनदेवी चौक, यशोधरानगर आणि नफीसखान ऊर्फ सोनू फरीद खान (२१) रा. टेकानाका नवी वस्ती, ताजनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अदिती शैलेंद्र सावनसुखा (२३) रा. इतवारी ही रायपूरला नातेवाईकांकडे लग्नासाठी गेली होती. परतीच्या प्रवासात ती रेल्वेगाडी क्रमांक १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसने (कोच बी-२, बर्थ २८) नागपूरला येत होती. नागपुरात गाडी आल्यानंतर जवळ चार बॅग असल्यामुळे अदिती बॅग घेऊन कोचच्या दाराजवळ उभी होती. तिच्या हातात एक हॅन्डबॅग होती. यावेळी आरोपी डी कॅबिन परिसरात रेल्वे लाईन ओलांडत होते. गाडी आल्यामुळे ते भिंतीजवळ उभे होते. अदिती उभी असल्याचे पाहून मो. इरफान ऊर्फ सोनू मो. इकबालने कोचच्या दाराजवळ येऊन अदितीच्या हाताला हिसका देऊन बॅग हिसकावली. गाडीचा वेग कमी असल्यामुळे अदितीने गाडीखाली उडी घेतली. परंतु ती खाली पडली. परत उठून तिने आरोपीचा पाठलाग सुरू केला. परंतु आरोपी भिंतीवरून उडी मारून पसार झाला होता. त्यानंतर लोहमार्ग पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांनी तपासाची चके्र फिरविली. त्यांनी चमू गठित करून तपास सुरू केला. पोलिसांच्या चमूने दुपारी ३ पासून सातत्याने रेल्वेस्थानक परिसर आणि गुन्हेगार राहत असलेल्या वस्त्यांत शोधकार्य सुरू केले. अखेर सकाळी ४ वाजताच्या सुमारास मो. इरफान ऊर्फ सोनू मो. इकबाल याला त्याच्या राहत्या घरून अटक केली. त्याच्याजवळ २० हजार रुपये रोख आणि पर्स आढळली.
त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपल्या दोन सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्यानंतर मो. आमीर अन्सारी ऊर्फ सोनू मुस्लिम अन्सारी याच्याजवळून पाच हजार, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि नफीस खान ऊर्फ सोनू फरीद खान याच्याकडून पाच हजार रुपये जप्त केले. (प्रतिनिधी)
महेंद्र मानकर अन् चमू जागली रात्रभर
दुपारी ३.३० वाजता गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील नायक पोलीस शिपाई महेंद्र मानकर याने तत्परतेने काम सुरू केले. आपल्यासोबत त्याने दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, विनोद नांदे, संतोष निंबुरकर, चंद्रशेखर मदनकर, रोशन मोगरे, धीरज कटुके, श्रीकांत उईके, योगेश धुरडे आदींना सोबत घेऊन तपास सुरू केला. रात्रभर जागून या चमूने आरोपींचा शोध घेतला. सकाळी ४ वाजता त्यांना या घटनेतील आरोपीचा छडा लावण्यात यश मिळाले.
‘आरपीएफ’च्या जगदीश सोनीची भूमिका मोलाची
आरोपी बॅग घेऊन पळत असताना गार्ड लाईनजवळ राहणाऱ्या आरपीएफच्या जगदीश सोनीने पाहिले. आपल्या चार वर्षाच्या मुलाला बाजूला ठेवून त्याने आरोपीचा पाठलाग केला. परंतु भिंतीवरून उडी मारून आरोपी पसार झाला. आरोपी पळून जाताना त्याच्या विरुद्ध दिशेने एक पाणी विक्रेता येत असल्याचे सोनी याने पाहिले होते. त्यामुळे या पाणी विक्रेत्याने आरोपीचा चेहरा पाहिल्याचे जगदीश सोनीने लोहमार्ग पोलिसांना सांगितले. या पाणी विक्रेत्याला सोबत घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या चमूने आरोपींचा शोध घेतला.
त्वरित गुन्हा दाखल करून दाखविली तत्परता
अदितीने दाखविलेल्या हिमतीला लोहमार्ग पोलिसांनी दाद दिली आहे. पोलिसांनीही तत्परता दाखवत अवघ्या दहा मिनिटात गुन्हा दाखल केला. यात सहायक उपनिरीक्षक खुशाल शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्युटीवरील हेड कॉन्स्टेबल करुणा मेश्राम, सुजित बहादुरे यांनी त्वरित कागदोपत्री कारवाई करून गुन्हा दाखल केल्यामुळे तपासकार्य सुरू करता आले.