दीक्षाभूमीवर वैचारिक प्रबोधनाची पर्वणी
By Admin | Updated: April 9, 2016 03:03 IST2016-04-09T03:03:40+5:302016-04-09T03:03:40+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य संयुक्त नागरी जयंती समारोह समिती आणि प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी...

दीक्षाभूमीवर वैचारिक प्रबोधनाची पर्वणी
बाबासाहेबांची १२५ वी जयंती : जेएनयूची संचालिका, रोहित वेमुलाची आई येणार
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य संयुक्त नागरी जयंती समारोह समिती आणि प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे १० ते १४ एप्रिल दरम्यान ‘डॉ. आंबेडकरांचे औचित्य : आज आणि उद्या’ या विषयावर वैचारिक व प्रबोधनात्मक परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. डॉ. कृष्णा कांबळे व डॉ. प्रदीप आगलावे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. १९१६ मध्ये लंडन विद्यापीठात स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतला होता. बरोबर १०० वर्षानंतर त्याच विद्यापीठातील मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र या विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. डेव्हीड मॉस हे दीक्षाभूमीवर १३ एप्रिल रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मार्गदर्शन करतील. त्यांच्यासोबत युजीसीचे माजी अध्यक्ष आणि केंद्र सरकारच्या भारतीय समाज विज्ञान अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, भदंत विमलकीर्ती गुणसिरी प्रमुख अतिथी राहतील. पहिल्या दिवशी १० एप्रिल रोजी महिलांकरिता विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात जेएनयूच्या संचालिका डॉ. संघमित्रा आचार्य, छाया कोरेगावकर (मुंबई), प्रीती हरित (गुडगाव) आणि रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला (हैदराबाद) या प्रमुख वक्ते राहतील. ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांना समर्पित विशेष परिसंवाद होईल. या अशोक सरस्वती यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. आ.ह. साळुंखे, मराठा सेवा संघाचे समन्वयक श्रीमंत शिवाजी कोकाटे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष अॅड. वैशाली डोळस प्रमुख वक्ते राहतील. १२ एप्रिल रोजी अल्पसंख्याक यावर विशेष परिसंवाद होईल. यात डॉ. जॉन दयाल (नवी दिल्ली) , अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, सेंटर फॉर स्टडी आॅफ सोसायटी अॅण्ड सेकुलॅरिझमचे संचालक इरफान अली इंजिनियर आणि प्रो. डॉ. दीपक कुमार (पंजाब) हे प्रमुख वक्ते राहतील. कार्यक्रम दररोज सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. पत्रपरिषदेला स्मारक समितिचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुनील तलवारे, डॉ. सुचित बागडे, अरुणा सबाने, डॉ. सरोज आगलावे, अशोक उरकुडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय व सामाजिक एकतेसाठी बाईक रॅली
१४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता राष्ट्रीय व सामाजिक एकतेसाठी दीक्षाभूमी ते दीक्षाभूमी बाईक रॅली काढण्यात येईल. यात शहरातील विविध संघटनांसह तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होतील. यासोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वातंत्र्य, समता व बंधूता यावर आधारित चित्र प्रदर्शन राहणार आहे.