सहायक पोलीस निरीक्षक गजाआड

By Admin | Updated: December 11, 2014 00:51 IST2014-12-11T00:51:47+5:302014-12-11T00:51:47+5:30

कोठडीत टाकण्याची धमकी देणाऱ्या हुडकेश्वरच्या सहायक पोलीस निरीक्षकाला (एपीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज पाच हजारांची लाच घेताना पकडले.

Assistant Police Inspector Gazaad | सहायक पोलीस निरीक्षक गजाआड

सहायक पोलीस निरीक्षक गजाआड

पाच हजारांची लाच घेतली : एसीबीने बांधल्या मुसक्या
नागपूर : कोठडीत टाकण्याची धमकी देणाऱ्या हुडकेश्वरच्या सहायक पोलीस निरीक्षकाला (एपीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज पाच हजारांची लाच घेताना पकडले.
विशाल प्रभूलाल जयस्वाल (वय ३७) असे आरोपी एपीआयचे नाव आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून हुडकेश्वर ठाण्यात कार्यरत आहे.
६ डिसेंबरला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती तस्करी करणाऱ्या ट्रकचालकांना हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत पकडले होते. महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी ट्रकचालकांसोबतच ट्रक मालकांवरही गुन्हे दाखल केले. त्याची चौकशी एपीआय जयस्वालकडे होती. जयस्वालने सुनील तांडेकर या ट्रकमालकासोबत संपर्क साधला. पाच हजार रुपये लाच दिली तर कोठडीत बंद करणार नाही. कागदोपत्री अटक करून लगेच कोर्टात हजर करू. लाच दिली नाही तर, अटक करून रात्रभर पोलीस कोठडीत ठेवीन आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करून पीसीआर घेईल, अशी धमकी जयस्वालने दिली.
तांडेकर यांना एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी तशी तक्रार नोंदवली. जाधव यांनी शहानिशा केल्यानंतर आज सकाळी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन तांडेकर पोलीस ठाण्यात पोहचले. ती स्वीकारताच एसीबीच्या पथकाने एपीआय जयस्वालला जेरबंद केले. पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक लाच घेताना पकडला गेल्याच्या वृत्तामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)
इतरांकडूनही वसुली
जयस्वालने अशाच प्रकारे अन्य ट्रकचालक-मालकांकडूनही मोठी रक्कम उकळल्याची चर्चा आहे. त्यांनी कारवाईच्या धाकाने तक्रार नोंदवली नाही. मात्र, तांडेकर यांनी हिंमत दाखवली. तांडेकर यांना जयस्वालने १५ हजार रुपये मागितले होते. घासाघिस केल्यानंतर ५ हजारांच्या लाचेवर सौदा पक्का झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील लाचखोरीची उघडकीस आलेली वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जाकीर कनोजे नामक शिपायाला एसीबीच्या पथकाने पकडले होते.
घरझडतीत रोकड सापडली
लाच घेताना पकडल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या नागपुरातील निवासस्थानी झडती घेतली. यावेळी घरात काही कागदपत्रे सापडली. त्यानुसार, जूनपासून आतापर्यंत एका बँकेच्या खात्यात २ लाख ५० हजार जमा केल्याचे उघड झाले. यासोबतच त्याच्याकडे १ लाख, ३० हजारांची अन्य बचत पोस्टात असल्याचे स्पष्ट झाले. जयस्वाल याचे नागपूरसोबतच पुसद, यवतमाळ येथेही निवासस्थान असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

Web Title: Assistant Police Inspector Gazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.