विधानसभा निवडणूक : पहिल्याच दिवशी ३६०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 22:53 IST2019-09-19T22:50:28+5:302019-09-19T22:53:41+5:30
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी ३६०० जणांना प्रशिक्षण देण्यात आले.

विधानसभा निवडणूक : पहिल्याच दिवशी ३६०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ३६०० अधिकारी -कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मतदान केंद्र अधिकारी, झोनल अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी यांचा समावेश आहे.
तत्पूर्वी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रकिया राबविताना प्रत्यक्ष कामाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण २६ सप्टेंबरपर्यत राहणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे आवश्यक असल्याची सूचना प्रशिक्षण वर्गाचे नोडल अधिकारी रवींद्र कुंभारे यांनी दिली. विधानसभा निवडणूक कामकाजासाठी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला असून येत्या २६ सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण चालणार आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली २६ हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी ३६०० अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सुजाता गंधे तसेच उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी मार्गदर्शन केले.
निवडणूक कामकाजासाठी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या दर दिवशी दोन बॅचेस आहेत. पहिली बॅच सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० पर्यंत तर दुसरी बॅच दुपारी १ ते ३.३० या कालावधीत राहते. प्रत्येक बॅचमध्ये १८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्य सरकार, केंद्र सरकार व शासनाशी संबंधित इतर कार्यालयात काम करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांची ड्युटी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी लावण्यात आली आहे.