दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST2020-12-06T04:08:07+5:302020-12-06T04:08:07+5:30
नागपूर : दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे एका गुंडाने कबाड विक्रेत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ...

दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे प्राणघातक हल्ला
नागपूर : दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे एका गुंडाने कबाड विक्रेत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अबू मियानगर टॉवरजवळ गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास ही घटना घडली.
ऋषिकांत किशोर कापसे (वय ३०) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तो वाठोड्यात राहतो. दिवसभर फिरून कबाड विकत घेणे आणि नंतर ते मोठ्या कबाडीकडे विकणे, असा त्याचा दिनक्रम आहे.
नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास कापसे कबाड विकून आपल्या घरी परत जात असताना त्याच्या घराजवळ आरोपी अप्पू तांगडे (वय १९) याने त्याला रोखले. दारू प्यायची आहे, असे आरोपी म्हणाला. कापसेने त्याला नकार दिल्याने आरोपीने शिवीगाळ करून वाद घातला. एवढेच नव्हे तर आरोपीने जवळचा चाकू काढून कापसेवर प्राणघातक हल्ला चढवला. यात कापसे गंभीर जखमी झाला. आजूबाजूची मंडळी धावल्याने आरोपीच्या तावडीतून कापसेची सुटका झाली. त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. नंतर त्याने दिलेल्या माहितीवरून वाठोडा पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.
---