थुंकल्यामुळे भावावर प्राणघातक हल्ला, आरोपीला सात वर्षे कारावासाची शिक्षा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: January 23, 2024 05:55 PM2024-01-23T17:55:52+5:302024-01-23T17:56:01+5:30

उच्च न्यायालयाचा निर्णय : वर्धा जिल्ह्यामधील घटना

Assault on brother due to spitting, Accused sentenced to seven years imprisonment | थुंकल्यामुळे भावावर प्राणघातक हल्ला, आरोपीला सात वर्षे कारावासाची शिक्षा

थुंकल्यामुळे भावावर प्राणघातक हल्ला, आरोपीला सात वर्षे कारावासाची शिक्षा

नागपूर : तोंडाकडे पाहून खर्रा थुंकल्यामुळे भावावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची सुधारित शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना वर्धा जिल्ह्यामधील आहे.

रमेश उर्फ श्याम पंढरीनाथ गावंडे (३५) असे आरोपीचे नाव असून तो अल्लीपूर, ता. हिंगणघाट येथील रहिवासी आहे. २५ जुलै २०२२ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता अपील अंशत: मंजूर करून कारावासाच्या शिक्षेत बदल केला. दंड कायम ठेवण्यात आला. आरोपीची आई सुगंधाबाई (७०) हिला ३२४ (शस्त्राने जखमी करणे) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयाने तिने आतापर्यंत भोगलेली कारावासाची शिक्षा पुरेशी ठरविली.

अशी घडली घटना
मृताचे नाव गजानन होते. त्याचा आरोपीसोबत हिस्सेवाटणीवरून वाद सुरू होता. त्याने दिवाणी न्यायालयात खटलाही दाखल केला होता. ९ जून २०१३ रोजी दुपारी ४ च्या सुमारास तो शेजाऱ्यांसोबत बोलत होता तर, रमेश कुऱ्हाडीने लाकडे फोडत होता. दरम्यान, गजानन खर्रा खाऊन बाजूला थुंकला. त्यामुळे रमेश चिडला. तु माझ्याकडे पाहून का थुंकला, असे म्हणत त्याने गजाननवर कुऱ्हाडीने हल्ला केला. गजाननची पत्नी मदतीसाठी धावली असता तिला सुगंधाबाईने पकडून कुऱ्हाडीच्या मागच्या बाजूने जखमी केले. गजाननचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Assault on brother due to spitting, Accused sentenced to seven years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग