सनदी लेखापालावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: May 26, 2017 02:45 IST2017-05-26T02:45:43+5:302017-05-26T02:45:43+5:30
एका सनदी लेखापालाच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात विलास कोळी (वय अंदाजे ४४) गंभीर जखमी झाले आहे.

सनदी लेखापालावर प्राणघातक हल्ला
मालमत्तेचा वाद : नातेवाईक बनला शत्रू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका सनदी लेखापालाच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात विलास कोळी (वय अंदाजे ४४) गंभीर जखमी झाले आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज रात्री झालेल्या या हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास कोळी हे चार्टर्ड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सदर परिसरात एका पानटपरीवर पान खायला आले होते. तेवढ्यात मागून अॅक्टिव्हावर आलेल्या दोनपैकी एका आरोपीने मोठमोठ्याने शिवीगाळ करीत कोळी यांच्या डोक्यावर हातोडीचे फटके हाणले. यामुळे कोळी गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने आजूबाजूच्यांच्या मदतीने त्यांना लगेच बाजूच्या खासगी इस्पितळात दाखल केले. या घटनेची माहिती कळताच सदर पोलिसांचा ताफा पोहचला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या अॅक्टिव्हाचा क्रमांक मिळाल्यानंतर आरोपींची पोलिसांनी शोधाशोध केली. कोळी यांच्या नात्यातील महिलेच्या नावावर ही अॅक्टिव्हा होती.
महिलेला विचारपूस केली असता तिच्या अन्य एका नातेवाईकाने ती काही वेळेपूर्वी नेल्याची माहिती मिळाली. त्यावरून सुमंत खणसेवार याने एका साथीदाराच्या मदतीने कोळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली. मालमत्तेच्या वादातून हा हल्ला झाल्याचेही नातेवाईकांच्या बयानातून स्पष्ट झाले. यापूर्वीही याच कारणावरून कोळींसोबत त्यांचा वाद झाला होता आणि कोळींच्या तक्रारीवरून आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपीचे मोबाईल स्वीच्ड आॅफ
कोळी यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या आरोपीचे नाव, पत्ता मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, त्याचे संपर्क क्रमांक स्वीच्ड आॅफ असल्याची रेकॉर्ड वाजत होती. परिणामी वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते.