मृत अभियंत्याची मालमत्ता हडपली
By Admin | Updated: November 19, 2015 03:45 IST2015-11-19T03:45:34+5:302015-11-19T03:45:34+5:30
लग्नाचे बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून त्या आधारावर एका सेवानिवृत्त आणि मृत अभियंत्याची संपूर्ण मालमत्ता हडपल्याप्रकरणी ...

मृत अभियंत्याची मालमत्ता हडपली
न्यायालय : बनावट पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, लग्नाचेही बनावट प्रमाणपत्र
नागपूर : लग्नाचे बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून त्या आधारावर एका सेवानिवृत्त आणि मृत अभियंत्याची संपूर्ण मालमत्ता हडपल्याप्रकरणी बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने आरोपी बनावट पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. मात्र या महिलेच्या मुलास आणि मुलीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. विजयमाला फुलचंद गजभिये (६१) रा. गोरले ले-आऊट, गोपालनगर, असे या आरोपी महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जे. के. कॉम्लेक्स येथील लोमेश देवीदास रामटेके (३५) यांच्या तक्रारीवर पाचपावली पोलिसांनी विजयमाला आणि अन्य लोकांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)
अन् सर्व मालमत्ता हडपली
या प्रमाणपत्राच्या आधारावर तिने देवीदास रामटेके यांची ग़्रॅज्युएटी, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, इतर दागिने, रोख, गोरले ले-आऊट येथील फ्लॅट, गिट्टीखदान ले-आऊट येथील फ्लॅट, हिंगणा टी पार्इंट येथील दुकान, रामनगर हिल टॉप येथील फ्लॅट, टाटा सियारा कार, असा बराच ऐवज हडप केला होता.
बुद्धविहारातून मिळवले लग्नाचे प्रमाणपत्र
या महिलेने ११ सप्टेंबर २०१५ रोजी बुद्धनगर येथील आनंद बुद्धविहारस्थित सर्वांगीण बुद्ध विकास मंडळाकडे देवीदास रामटेके यांच्यासोबत ९ सप्टेंबर २००१ रोजी लग्न झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्ज केला होता. तिने अर्जासोबत आनंद बुद्ध विहारात लग्न झाल्याची झेरॉक्स प्रत या अर्जासोबत जोडली होती. या प्रमाणपत्रावर बुद्धविहाराच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्काही नव्हता. तोंडी माहितीवर विश्वास ठेवून तिला लग्नाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. या लग्नानुसार ती विजयमाला देवीदास रामटेके झाली होती.