अशोक धवड यांना सशर्त जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST2020-11-26T04:21:21+5:302020-11-26T04:21:21+5:30
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक ...

अशोक धवड यांना सशर्त जामीन
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक शंकरराव धवड यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्वाळा दिला.
सुरुवातीला धवड यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. परंतु, त्यांना कुठेच दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ५ नोव्हेंबर २०१९ रोजी आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून ते कारागृहात हाेते. २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये बँकेत ३८.७५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. धवड यांनी गहाण मालमत्तांचे मूल्य वाढवून मोठमोठी कर्जे मंजूर केली. तसेच, विविध कारणांसाठी व्हाऊचरद्वारे बँकेच्या तिजोरीतून ८९ लाख ११ हजार ४६९ रुपये काढून घेतले. त्यांनी कर्ज मंजूर करताना अर्जदारांच्या कागदपत्रांची योग्य तपासनी केली नाही. यासह अनेक गैरप्रकार केल्याचे धवड यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी उप-लेखापरीक्षक श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीवरून धवड यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-ए, एमपीआयडी कायद्यातील कलम ३ व आयटी कायद्यातील कलम ६५ व ६५(ब) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. धवडतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, ॲड. देवेंद्र चव्हाण व ॲड. चैतन्य बर्वे यांनी कामकाज पाहिले.
------------
२० कोटीची मालमत्ता जप्त
प्राधिकाऱ्यांनी धवड यांची २० कोटी रुपये मूल्याची मालमत्ता व ८६ लाख रुपये जमा असलेली बँक खाती जप्त केली आहेत. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. आरोपींविरुद्ध ३५ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सरकारच्या वतीने ८० साक्षिदार तपासले जाणार आहेत.
--------------
या अटींचे करावे लागेल पालन
१ - न्यायालयात दोन लाख रुपयाचे वैयक्तिक बंधपत्र व तेवढ्याच रकमेचा जामिनदार सादर करावा लागेल.
२ - सरकारी साक्षिदारांवर दबाव आणण्याचा किंवा त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करता येणार नाही.
३ - पुराव्यांमध्ये छेडछाड करता येणार नाही. पोलिसांच्या परवानगीशिवाय शहराबाहेर जाता येणार नाही.
४ - पोलीस ठाण्यात पासपोर्ट जमा करावा लागेल. तसेच, प्रत्येक महिन्यातील पहिल्या गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल.