अजनी इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये ‘अशोक’
By Admin | Updated: July 7, 2014 01:08 IST2014-07-07T01:08:22+5:302014-07-07T01:08:22+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी येथील इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये नव्यानेच दाखल झालेल्या अशोक या इंजिनचा शुभारंभ नुकताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंग यांच्या हस्ते करण्यात आला.

अजनी इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये ‘अशोक’
२०० वे इंजिन दाखल : ‘डीआरएम’च्या हस्ते शुभारंभ
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी येथील इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये नव्यानेच दाखल झालेल्या अशोक या इंजिनचा शुभारंभ नुकताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. या इंजिनमुळे अजनीच्या इलेक्ट्रिक लोकोशेडमधील इंजिनची संख्या २०० झाली आहे.
पश्चिम बंगालच्या चित्तरंजन येथे तयार झालेले अशोक हे थ्री फेजचे इंजिन नागपूरच्या अजनी येथील इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये दाखल झाले आहे. अजनीच्या इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये यापूर्वी १९९ इंजिनची देखभाल व्हायची. २०० वे इंजिन दाखल झाल्यामुळे ही संख्या २०० वर पोहोचली आहे. ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी फित कापून या इंजिनचा शुभारंभ करून इंजिनची चाचणी घेतली. अजनीच्या इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये २०० इंजिन झाल्यामुळे आता रेल्वे रेल्वेगाड्यांच्या संचालनासाठी आणि मालवाहतुकीसाठी त्याचा फायदा होऊन विभागाला अधिक महसूल मिळणार आहे. लोकोशेडमध्ये सर्व विजेवर धावणाऱ्या इंजिनची देखभाल होते. शेडमधून बाहेर पडलेले इंजिन ४५ दिवसांनी पुन्हा देखभालीसाठी येते. १८ ते २० तासात देखभाल झाल्यानंतर पुन्हा हे इंजिन बाहेर पडते. दिवसाकाठी या इलेक्ट्रिक लोकोशेडमधून ३ ते ४ इंजिन देखभाल होऊन बाहेर पडतात. अशोक या थ्री फेजच्या नव्याने दाखल झालेल्या इंजिनच्या शुभारंभ प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंग, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नामदेव रबडे (टीआरडी), वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता सुखविंदरसिंग सिद्धु (टीआरएस), विभागीय विद्युत अभियंता महेश कुमार, सहायक विभागीय विद्युत अभियंता विजय गौतम, ए. के. ग्रोवर, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त इब्राहिम शरीफ, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञ अशोकच्या नावाने धावणार इंजिन
अजनीच्या इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये नव्यानेच दाखल झालेल्या २०० व्या इंजिनचे नाव अशोक असे ठेवण्यात आले आहे. याला या इलेक्ट्रिक लोकोशेडमधील झालेला एक अपघात कारणीभूत आहे. एका अपघातात याच लोकोशेडमध्ये कार्य करणाऱ्या अशोक पटले या तंत्रज्ञाचा मृत्यू झाला. अशोकच्या मुलाला रेल्वेच्या नोकरीत रुजू करून घेण्यात आले असून, आता त्याच्या नावाने नव्याने दाखल झालेले २०० वे इंजिन धावणार आहे.