लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुख्यमंत्री सचिवालयातील सहसचिव आशा पठाण (निचत) यांना भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती मिळाली आहे. केंद्र शासनाच्या पर्सनल पब्लिक ग्रिवन्सेस ॲण्ड पेंशन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील १२ जेष्ठ अधिकारी भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नत झाले आहे.
महाराष्ट्र महसूल सेवेत १९९९ मध्ये आशा पठाण यांची उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी उपविभागीय अधिकारी नागपूर, हिंगणघाट, उपजिल्हाधिकारी भूमी अधिग्रहण, गोसेखुर्द, मिहान, एमआयडीसी या पदांवर कार्य केले आहे. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यधिकारी म्हणून सन २०१४ ते २०१९ पर्यंत नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयाचा पदभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला होता. त्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी, गोसेखुर्द प्रकल्पाचे उपायुक्त त्यानंतर अतिरीक्त जिल्हाधिकारी नागपूर व भंडारा येथील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांना पर मुख्यमंत्री सचिवालयात सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
आशा पठाण यांना ड्युके ऑफ एडनबर्ग अवार्ड, बुलडाणा जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे.
आशा पठाण या अभियांत्रिकीमध्ये काॅम्प्युटर सायन्सच्या पदविधारक असून त्यांनी कोपरगांव येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले असून त्यानंतर त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाली. त्यांचे शालेय शिक्षण सजिवण विद्यालय पाचगणी तसेच बुलडाणा येथील शिवाजी हायस्कुल येथून पूर्ण झाले आहे.