नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असल्याची टीका केली. तर सभागृहाचे कामकाज संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावांना भेटी देत त्यांनी शेतीची पाहणी केली.
नागपूर जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जवळपास १२४ गावांना फटका बसला व ८५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले. रामटेकृ, पारशिवणी तालुक्यातही नुकसान झाले. धानासोबतच कापूस, तूर, संत्रा पिकांचेही नुकसान झाले. गुरुवारी विधानसभेचे कामकाज तहकुब होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची चर्चा केली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार कृपाल तुमाने, आ. आशिष जायस्वाल, आ. टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्यासह कृषी, पणन, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.