पूर्व विदर्भातल्या तब्बल ३,३२८ बालकांचा जन्म झालाय रुग्णवाहिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 07:45 IST2022-03-06T07:45:00+5:302022-03-06T07:45:02+5:30
Nagpur News ‘जीववाहिनी’ म्हणून ओळख असलेली रुग्णवाहिका बालकांचे जन्मस्थानही झाली आहे. तब्बल ३ हजार ३२८ बालकांचा जन्म या रुग्णवाहिकेत झाला आहे.

पूर्व विदर्भातल्या तब्बल ३,३२८ बालकांचा जन्म झालाय रुग्णवाहिकेत
सुमेध वाघमारे
नागपूर : मागील सात वर्षांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील १०८ रुग्णवाहिकेने एकूण ९ लाख ५३ हजार ०६३ रुग्णांवर तातडीने औषधोपचार करून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ‘जीववाहिनी’ म्हणून ओळख असलेली ही रुग्णवाहिका बालकांचे जन्मस्थानही झाली आहे. तब्बल ३ हजार ३२८ बालकांचा जन्म या रुग्णवाहिकेत झाला आहे.
रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीत रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळवे म्हणून २०१४ मध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्यात आली. १०८ क्रमांक डायल करताच ही रुग्णवाहिका डॉक्टरासह दारात पोहोचते. मार्च २०१४ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यामातून रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचाराची सोय या रुग्णवाहिकेने केली आहे.
-नागपूर पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात १०८ ची सर्वाधिक सेवा
१०८ रुग्णवाहिकेचा सेवेचा सर्वाधिक लाभ सहा जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांनी घेतला आहे. सात वर्षांत नागपूर जिल्ह्यातील ३ लाख २१ हजार ७८५ रुग्णांना तर चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख ३१ हजार ९३३ रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतला आहे. या शिवाय, गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २१ हजार २७३, भंडारा जिल्ह्यातील ९६ हजार ८५२, वर्धा जिल्ह्यातील ९२ हजार २११, तर गडचिरोली जिल्ह्यातील ८९ हजार ००९ रुग्णांना याचा फायदा झाला.
-८२ हजार कोविड रुग्णांना दिली सेवा
कोरोनाचा या तीन लाटांत १०८ रुग्णवाहिकेने सहा जिल्ह्यांतील ८२ हजार ०६२ रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ३७ हजार २६९, नागपूर जिल्ह्यातील १६ हजार ५९१, गोंदिया जिल्ह्यातील ११ हजार ०८६, भंडारा जिल्ह्यातील ५ हजार ५२२, तर वर्धा जिल्ह्यातील ९ हजार १५१ कोरोनाबाधितांना सेवा देण्यात आली.
-नागपुरातील १००० बालकांचे जन्मस्थान रुग्णवाहिका
प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊन माता व बालमृत्यू होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अशा वेळी तातडीचा योग्य उपचार महत्त्वाचा ठरतो. १०८ रुग्ण वाहिकेतील डॉक्टर व प्रशिक्षित चालकांमुळे प्रसूतीची वेळ आलेल्या महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसूती करून १ हजार बालकांनी जन्म घेतला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ७२०, वर्धा जिल्ह्यातील ४७९, गडचिरोली जिल्ह्यातील ४२९, गोंदिया जिल्ह्यातील ३८८ तर भंडारा जिल्ह्यातील ३१२ बालकांचे जन्माचे ठिकाण हीच रुग्णवाहिका ठरली.
जिल्हा : रुग्णवाहिकेत जन्म घेतलेली बालके
भंडारा : ३१२
चंद्रपूर : ७२०
गडचिरोली : ४२९
गोंदिया : ३८८
नागपूर : १०००
वर्धा : ४७९