आरोपी अरविंद सिंगने थांबविला खटला
By Admin | Updated: February 10, 2015 00:51 IST2015-02-10T00:51:17+5:302015-02-10T00:51:17+5:30
योग्य न्यायासाठी आपणाविरुद्धचा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित केला जावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता सोमवारी खुद्द आरोपी अरविंद सिंग याने युग चांडक

आरोपी अरविंद सिंगने थांबविला खटला
नागपूर : योग्य न्यायासाठी आपणाविरुद्धचा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित केला जावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता सोमवारी खुद्द आरोपी अरविंद सिंग याने युग चांडक अपहरण खून खटल्याची सुनावणी थांबवली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू असून, न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब केली.
‘चप्पल’वरून गोंधळ
आरोपी अरविंद सिंग याच्या कबुलीजबाबातील एक पंच साक्षीदार हर्ष प्रकाशचंद्र फिरोदिया याची सरतपासणी सरकारी वकील ज्योती वजानी यांनी घेतली. या साक्षीदाराने असे सांगितले की, अरविंद सिंग याने लकडगंज पोलीस ठाण्यात आपल्या व अन्य दुसऱ्या पंचासमोर कबुलीजबाब दिला होता. माझ्या घरी चला , मी गुन्ह्यात वापरलेले कपडे व साहित्य काढून देतो, असे तो म्हणाला होता. ९ सप्टेंबर २०१४ रोजी त्याने हा कबुलीजबाब दिला होता. त्यानंतर पोलीस आणि आम्ही दोन पंच अरविंद सिंगसोबत त्याच्या जरीपटका कपिलनगर येथील घरी गेलो. घरातून त्याने लाल रंगाचा युगचा टी-शर्ट, युगच्या कानातील बाळी आणि स्वत:चे कपडे काढून दिले होते, असेही या साक्षीदाराने सांगितले.
या साक्षीदाराची उलटतपासणी आरोपी राजेश दवारे याचे वकील अॅड. प्रदीप अग्रवाल यांनी घेण्यास नकार दिला. दुसरा आरोपी अरविंद सिंग याचे वकील अॅड. मनमोहन उपाध्याय यांनी या साक्षीदाराची उलटतपासणी सुरू केली.
उपाध्याय यांनी या साक्षीदारास कबुलीजबाबाच्या वेळी आरोपीने कोणते कपडे घातले होते, असा प्रश्न करताच साक्षीदाराने पांढऱ्या रंगाच्या कपड्याचा उल्लेख केला. आरोपीने कोणती चप्पल घातली होती, असा प्रश्न करताच न्यायालयाने हस्तक्षेप करीत अॅड. उपाध्याय यांना थांबवले. या प्रश्नाचा या खटल्याशी संबंध नाही, म्हणून आपण या प्रश्नाची आणि उत्तराचीही नोंद करणार नाही, असे स्पष्ट केले. यावर अॅड. उपाध्याय आणि न्यायाधीशात शाब्दिक चकमक उडाली. लागलीच उपाध्याय यांनी आरोपी अरविंद सिंग याच्यावतीने न्यायालयात खटला तहकुबीचा अर्ज दाखल केला.
महत्त्वाच्या साक्षीदाराला वस्तुस्थितीवर आधारित उलटतपासणीत आपल्या वकिलास प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीबाबतचा प्रश्न विचारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे योग्य न्यायासाठी हा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित व्हावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता हा खटला तहकूब करावा, असा उल्लेख अर्जात करण्यात आला.
साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीसाठी प्रश्न विचारण्याचे प्रावधान कोणत्याही कायद्यात नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट करून खटल्याची सुनावणी २३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. न्यायालयात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील अॅड. राजेंद्र डागा उपस्थित होते. (प्रतिनिधी)