अरुण गवळीची सुटका लांबणीवर

By Admin | Updated: May 3, 2015 02:05 IST2015-05-03T02:05:02+5:302015-05-03T02:05:02+5:30

विभागीय आयुक्तांचा आदेश नागपूर मध्यवर्ती कारागृहात उशिरा पोहोचल्याने मुंबईचा डॉन आणि एका खुनातील जन्मठेपी अरुण ऊर्फ डॅडी गुलाब गवळी .....

Arun Gawli's release | अरुण गवळीची सुटका लांबणीवर

अरुण गवळीची सुटका लांबणीवर

नागपूर : विभागीय आयुक्तांचा आदेश नागपूर मध्यवर्ती कारागृहात उशिरा पोहोचल्याने मुंबईचा डॉन आणि एका खुनातील जन्मठेपी अरुण ऊर्फ डॅडी गुलाब गवळी याची शनिवारी होणारी पॅरोलवरील सुटका लांबणीवर पडली आहे. पुढचे दोन दिवस सरकारी सुटीचे असल्याने तो मंगळवारी कारागृहाच्या बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अरुण गवळीचा मुलगा महेश याचे लग्न ९ मे रोजी मुंबई येथे होणार आहे. लग्नात हजर राहण्यासाठी त्याने नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे पॅरोल रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्याने विभागीय आयुक्ताच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. २७ एप्रिल रोजी ही याचिका मंजूर होऊन उच्च न्यायालयाने गवळीला पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गवळीच्या कुटुंबाकडून पॅरोलवर सुटका होण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शनिवारी सायंकाळपर्यंत त्याच्या सुटकेची दाट शक्यताही होती. सायंकाळच्याच विमानाने तो मुंबईकडे रवानाही होणार होता. त्यासाठी संपूर्ण तयारीही झाली होती. त्याला घेण्यासाठी त्याचे समर्थक मोठ्या प्रमाणावर कारागृहासमोरही जमले होते. परंतु विभागीय आयुक्तांचा त्याला सोडण्याबाबतचा आदेश कारागृहात उशिरा पोहोचला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्त अनुप कुमार हे वर्धा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. ते उशिरा कार्यालयात परत आले. लागलीच त्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतर हा आदेश कारागृहाकडे रवाना झाला. परंतु आदेश पोहोचण्यास बराच विलंब झाला होता. गवळी कारागृहाबाहेर पडणार नसल्याची खात्री झाल्याने त्याचे समर्थक निराश होऊन परत गेले. गवळी बाहेर पडण्याच्या शक्यतेने कारागृहासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.(प्रतिनिधी)

Web Title: Arun Gawli's release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.