अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये आणखी शुक्रवारपर्यंत वाढ
By Admin | Updated: May 27, 2015 03:07 IST2015-05-27T03:07:38+5:302015-05-27T03:07:38+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने जन्मठेपेचा कैदी मुंबईचा डॉन अरुण गवळी ...

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये आणखी शुक्रवारपर्यंत वाढ
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने जन्मठेपेचा कैदी मुंबईचा डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याच्या पॅरोलमध्ये शुक्रवारपर्यंत वाढ केली आहे.
आपल्या ८६ वर्षीय वृद्ध आईच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आपली पॅरोल ३० दिवसांनी वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज गवळीने नागपूर विभागीय आयुक्तांकडे केला होता. आयुक्तांनी अर्जावर तातडीने निर्णय न घेतल्याने त्याने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी करून गवळीच्या पॅरोलमध्ये २६ मेपर्यंत तात्पुरती वाढ केली होती.
आज मंगळवारी पुन्हा हे प्रकरण सुनावणीस आले. दरम्यान राज्य सरकारचे उत्तरही दाखल झाले.
गवळीने अद्यापही आपल्या आईच्या आजाराबाबतचे वैद्यकीय दस्तऐवज न्यायालयात दाखल केलेले नाहीत. तसेच हा आजार गंभीर आजाराच्या यादीत मोडत नाही. त्यामुळे त्याला ३० दिवसांचा पॅरोल वाढवून देण्यात येऊ नये, याचिका फेटाळली जावी, असे उत्तरात नमूद करण्यात आलेले आहे.
न्यायालयाने गवळीच्या पॅरोलची तात्पुरती मुदत शुक्रवारपर्यंत वाढवून दिली. शुक्रवारीच त्याच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
गवळीचा मुलगा महेशचे ९ मे रोजी मुंबईत लग्न होते. त्यासाठी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी गवळीला १५ दिवसांची सशर्त पॅरोल रजा मंजूर केली होती. त्याची ही रजा २१ मे रोजी संपली. तत्पूर्वी त्याने १३ मे रोजी नागपूर विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर करून आईच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी पॅरोलची मुदत आणखी ३० दिवसपर्यंत वाढविण्याची विनंती केली होती.
न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील शिशीर उके यांनी तर गवळीच्या वतीने वरिष्ठ वकील अॅड. अनिल मार्डीकर आणि अॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)