अरुण गवळीला पॅरॉल नाकारला
By Admin | Updated: April 25, 2015 02:18 IST2015-04-25T02:18:31+5:302015-04-25T02:18:31+5:30
कुख्यात डॉन अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

अरुण गवळीला पॅरॉल नाकारला
नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला मुलाच्या लग्नासाठी सुट्या मिळाव्यात, यासाठी त्याने अर्ज केला होता. मात्र अरुण गवळीच्या पॅरॉल अर्जावर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आक्षेप घेतल्याने, त्याचा अर्ज विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावला.
अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसांदेकर यांच्या खूनप्रकरणात २०१२ साली मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. तेव्हा शिक्षा भोगण्यासाठी त्याला नागपूर कारागृहात हलविण्यात आले. गवळीविरुद्ध मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. या प्रकरणांच्या सुनावणीसाठी त्याला मुंबईला रिंमांडवर नेण्यात आले होते.
दरम्यान तो तळोजा कारागृहात होता. १६ मार्च रोजी त्याला नागपूर कारागृहात आणण्यात आले. येथे येताच त्याने मुलाच्या लग्नाचे कारण सांगून पॅरॉलसाठी अर्ज केला. (प्रतिनिधी)
‘डॅडी’ची सून नागपूरची
अरुण गवळी ऊर्फ ‘डॅडी’ची सून ही नागपुरातीलच आहे. सध्या ती एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी एका सामूहिक विवाह सोहळ््यात गवळीचा मुलगा महेश व या मुलीची ओळख झाली होती. त्यानंतर नागपूर कारागृहातच गवळीने लग्नाला होकार दिला अशी माहिती सूत्रांनी दिली.
गवळी कोणत्या खात्याचे मंत्री ?
अरुण गवळीच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर अरुण गवळी यांच्या नावाखाली आमदार आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री असा उल्लेख आहे. त्यामुळे गवळी हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गवळी हे सध्या विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, हे येथे उल्लेखनीय.