स्वतंत्र प्रतिभेची कलाकृतीच अस्सल असते
By Admin | Updated: July 6, 2014 00:56 IST2014-07-06T00:56:07+5:302014-07-06T00:56:07+5:30
एखाद्या नाटककाराची एखादी नाट्यकृती लोकप्रिय झाली की, त्याच प्रकारच्या नाट्यकृती निर्माण करण्याचा मोह स्वाभाविकपणे होतो. जागतिक पातळीवरही हेच होत आले आहे.

स्वतंत्र प्रतिभेची कलाकृतीच अस्सल असते
सुनील रामटेके : ‘जावयाचं रामायण’ एकांकिका संग्रहाचे प्रकाशन
नागपूर : एखाद्या नाटककाराची एखादी नाट्यकृती लोकप्रिय झाली की, त्याच प्रकारच्या नाट्यकृती निर्माण करण्याचा मोह स्वाभाविकपणे होतो. जागतिक पातळीवरही हेच होत आले आहे. पण स्वतंत्र प्रतिभेने स्वत:च्या विचार आणि आकलनातून वेगळ्या धाटणीची कलाकृती निर्माण करणारा नाटककार स्वत:ची स्वतंत्र वाट निर्माण करतो. यातच क्रांतीची बिजे असतात. हीच अस्सल आणि नवनिर्मित कलाकृती असते, असे मत डॉ. सुनील रामटेके यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व श्री नवदुर्गा प्रकाशन, कोल्हापूरच्यावतीने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात डॉ़ दिनेश काळे लिखित ‘जावयाचं रामायण’ या मराठी एकांकिका संग्रहाचे प्रकाशन लोकमतचे समन्वय संपादक कमलाकर धारप यांच्या हस्ते करण्यात आले़ याप्रसंगीडॉ़ सुनील रामटेके बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी किशोर आयलवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्रा़ संयुक्ता थोरात, कवयित्री मनीषा साधू व रमेश बोरकुटे उपस्थित होते़
कलाकृतीच्या निर्मितीमागे प्रतिभावंताची अस्वस्थता असते. अनेक विवंचनेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नमालिकेतून मिळालेल्या अंत:स्थ प्रेरणेच्या दाराने लिखाण स्फुरते़ कलाकृतीवर काळ, स्थिती आणि मानसिकतेचा प्रभाव पडतो़ जे दिसते आहे ते लिहिण्याची स्फूर्ती मिळते़ यातून लिहिण्याचे समाधान मिळते आणि साहित्यकृती निर्माण होते, असे डॉ़ सुनील रामटेके म्हणाले़ कलाकृती वास्तववादी व रंजनवादी असतात़ पूर्वी प्रत्येक कृती रंजनवादीच असायची़ दुसऱ्या महायुद्धानंतर लिखाणाची शैली बदलली़ वास्तव दु:खाचे सावट पसरल्याने कलाकृतीतून वास्तववाद प्रकट व्हायला लागला़ या घटनाक्रमातून ही परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे ते म्हणाले़ याच बदलातून आता कमी शब्दांत कटाक्ष टाकणाऱ्या साहित्याची गरज भासायला लागली आहे़ हे कार्य कविता आणि नाट्य उत्तम करते़ म्हणूनच नवनाट्याच्या या काळात या गोष्टींकडे नाट्यलेखकांनी बघणे गरजेचे असल्याचे मत सुनील रामटेके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कमलाकर धारप यांनी लेखकाच्या नाट्यकृतींची प्रशंसा करून त्यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन अतुल शेबे यांनी केले़ यावेळी ‘आणि काय हवं’ व ‘जावयाचं रामायण’ या दोन एकांकिकांतील नाट्यप्रवेश सादर करण्यात आले़ (प्रतिनिधी)