बंदिजनांचा कलाविष्कार
By Admin | Updated: November 7, 2015 03:25 IST2015-11-07T03:25:35+5:302015-11-07T03:25:35+5:30
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन परिसरातील सभागृहात लावण्यात आले आहे.

बंदिजनांचा कलाविष्कार
मध्यवर्ती कारागृहात दिवाळीच्या वस्तूंचे प्रदर्शन
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन परिसरातील सभागृहात लावण्यात आले आहे. गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या या कैद्यांना त्यांच्या कलागुणांना हेरून, त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत. दिवाळीच्या पर्वावर या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कारागृहातील कैद्यांमध्ये असलेले विविध कलाकुसरीचे हुनर हेरून कारागृह प्रशासनाने त्यांना प्रशिक्षित केले. या प्रशिक्षणामुळे कैद्यांच्या गुणांना अधिक वाव मिळाला आणि त्यांच्या हातून आकर्षक वस्तू साकारू लागल्या. कैद्यांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू घराघरात पोहोचविण्यासाठी कारागृह प्रशासनाने हे प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शनात लाकडी सागवनचे फर्निचर, चौरंग पाट, व्यासपीठ, टी-टेबल सह विविध वस्तू विक्रीस आहे.
त्याचबरोबर हॅण्डलूमद्वारे तयार करण्यात आलेल्या चटया, चादरी, आसन, पायपुसणे उपलब्ध आहे. महिलांच्या पर्स, लहानग्यांसाठी टोपी, पणत्या, युवकांसाठी शर्ट, पॅन्ट व लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात प्रदर्शनात ठेवले आहे. बंदिजनांच्या कलागुणांची माहिती बाहेरच्यांना व्हावी, भविष्यात त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, हा कारागृह प्रशासनाचा उद्देश आहे.