नागपुरात सराफ व्यापाऱ्यांना गंडविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:41 IST2020-07-23T19:38:58+5:302020-07-23T19:41:06+5:30

स्वत:ची खोटी ओळख दाखवून आणि बनावट धनादेश देऊन सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी बुधवारी अटक केली.

Arrested, which disturbs Sarafa traders in Nagpur | नागपुरात सराफ व्यापाऱ्यांना गंडविणारा गजाआड

नागपुरात सराफ व्यापाऱ्यांना गंडविणारा गजाआड

ठळक मुद्दे बनावट ओळख देऊन करायचा फसवणूक : तहसील पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:ची खोटी ओळख दाखवून आणि बनावट धनादेश देऊन सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी बुधवारी अटक केली. आशुतोष महाजन असे या भामट्याचे नाव आहे.
सराफा व्यापारी दुकान बंद करीत असताना अचानक दुकानात जायचे. घरी पूजा सुरू आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने अथवा नाणी हवी आहे, असे सांगून घाई गडबडीत व्यापाऱ्याकडून नाणी किंवा सोन्याचे दागिने विकत घ्यायचे. त्या बदल्यात त्याला धनादेश द्यायचा आणि गायब व्हायचे, अशी या भामट्याची कार्यपद्धती आहे. त्याने दोन वर्षात नागपूरसह अनेक ठिकाणच्या सराफा व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला आहे. ९ जुलैला रात्री ७ च्या सुमारास इतवारीतील सराफा व्यापारी उत्तम गुलाबचंद कश्यप यांच्या सराफा दुकानात आरोपी असाच शिरला. डॉ. महाजन अशी स्वत:ची ओळख सांगून त्याने कश्­यप यांना मी तुमचा जुना ग्राहक आहे, मला तातडीने सोन्याचे १० ग्रॅम आणि ५ ग्रॅमचे नाणे पाहिजे असे म्हटले.
कोरोनामुळे दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे आज नाणे देता येणार नाही, असे कश्यप यांनी महाजनला सांगितले असता घरी धार्मिक विधी सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दोन नाणी पाहिजे, असे सांगून महाजनने कश्­यप यांना गळ घातली. त्यामुळे त्यांनी १० आणि ५ ग्रॅम अशी १५ ग्रॅमची दोन सोन्याची नाणी महाजनला दिली. ७८,४१४ रुपयांची सोन्याची नाणी घेऊन महाजनने कश्यप यांना धनादेश दिला. घाईगडबडीत रक्कम आणली नाही, पूजा सुरू असल्यामुळे तुम्ही आता धनादेश घ्या, असे सांगून महाजनने कश्­यप यांना जबरदस्तीने धनादेश दिला. हा धनादेश बँकेत जमा केला असता तो वटलाच नाही. आरोपीने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला असता प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे कश्यप यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार जयेश भांडारकर आणि त्यांच्या सहकाºयांनी चौकशी करून आरोपी महाजनला बुधवारी फसवणुकीच्या आरोपात अटक केली.

अनेक व्यापाऱ्यांची धाव
महाजनला अटक करण्यात आल्याचे कळताच इतवारी, नंदनवन, हुडकेश्वरसह १० ते १५ सराफा व्यापाऱ्यांनी तहसील पोलीस ठाण्यात धाव घेतली. या भामट्याने आपलीही लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना तक्रार देण्याची सूचना केली.

फरार, बोगस डॉक्टर
प्राथमिक चौकशीत आरोपी आशुतोष महाजन हा बोगस डॉक्टर असल्याचेही स्पष्ट झाले. स्वत:ची ओळख तो डॉक्टर महाजन अशी द्यायचा. मात्र चौकशीत त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळले नाही. तहसील पोलिसांनी बुधवारी त्याला रमना मारोती परिसरातून ताब्यात घेतले.

वणीतही गुन्हा दाखल
महाजन हा मूळचा वणी (जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहे. तेथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो वणीतून फरार झाला. गेल्या सहा महिन्यांपासून यवतमाळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वणीतून पळ काढल्यानंतर त्याने नागपुरातील महाल भागात आणि नंतर नंदनवनमध्ये लपूनछपून वास्तव्य सुरू केले होते.

Web Title: Arrested, which disturbs Sarafa traders in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.