हवालदाराला बोनेटवर पळवून नेणाऱ्या गुन्हेगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:46+5:302020-12-02T04:05:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिंदमवार यांना कारच्या बोनेटवर बसवून ...

हवालदाराला बोनेटवर पळवून नेणाऱ्या गुन्हेगाराला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिंदमवार यांना कारच्या बोनेटवर बसवून दुचाकींना धडक मारत पळून जाणारा आरोपी आकाश चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी देशमुख या दोघांविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चव्हाणला रात्री तर पल्लवीला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली.
रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास सक्करदरा चौक ते राजे रघुजी मार्गावर हे थरारनाट्य घडले होते. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून पुढे जात असलेल्या आरोपी चव्हाणची कार हवालदार अमोल यांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. तो थांबत नसल्याचे पाहून हवालदार अमोल कारसमोर उभे झाले. चव्हाणने त्यांना न जुमानता तशाच अवस्थेत कार दामटली. हवालदार अमोलही बोनेटवर चढले. त्या अवस्थेत सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत चव्हाणने आपली कार दामटवत काही दुचाकींना धडक मारली. वर्दळीच्या मार्गावर हे थरारनाट्य घडत असल्याचे पाहून नागरिकांनी धाव घेतली आणि चव्हाणची कार थांबवली. त्याला बाहेर खेचत त्याची बेदम धुलाई केली. नंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपी चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी या दोघांविरुद्ध पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करून, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या मैत्रीण पल्लवीला आज सकाळी अटक करण्यात आली.
आरोपी चव्हाण कुख्यात गुन्हेगार
आरोपी चव्हाण यवतमाळ जिल्ह्यातील केळापूरचा रहिवासी आहे. तो कुख्यात शेखू टोळीचा गुन्हेगार आहे. नागपूर - चंद्रपूरदरम्यान होणाऱ्या मद्य तस्करीतही त्याचे अनेकदा नाव आले असून खंडणी वसुलीच्या प्रकरणात शेखूसोबत तो एका गुन्ह्यात आरोपी असल्याची चर्चा आहे.