नागपूर : चाकू, सुरे घेऊन फिरणाऱ्या दोन गुंडांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन चाकू तसेच एक भाल्याचे पाते आणि दुचाकी जप्त केली.
कॉटन मार्केट कांजी हाऊस चौकाजवळ आरोपी आकाश मुन्नालाल गौर आणि सोहन निमजे हे दोघे शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती बुधवारी सायंकाळी ५ ला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ला मिळाली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक पंकज घाडगे, प्रशांत अन्नछत्रे, सहायक फौजदार रफीक खान, हवालदार अनिल जैन, रामचंद्र कारेमोरे, टप्पूलाल चुटे, अनुप तायवाडे, शिपाई संतोष चौधरी आणि अनिल बोटरे यांनी घटनास्थळ परिसरात जाऊन आरोपी आकाश गौर आणि सोहम निमजे या दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्या ताब्यातून तीन चाकू, एक टोकदार भाल्याचे पाते आणि दुचाकी असा ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांना गणेशपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही घातक शस्त्रे घेऊन ते कोणता गुन्हा करणार होते, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.
---