रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास अटक
By Admin | Updated: March 23, 2015 02:23 IST2015-03-23T02:23:12+5:302015-03-23T02:23:12+5:30
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाच्या सीआयबीच्या जवानांनी रंगेहाथ पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास अटक
नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाच्या सीआयबीच्या जवानांनी रंगेहाथ पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपीकडून १४ हजार २९५ रुपयाची रेल्वे प्रवासाची ९ तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.रेल्वे सुरक्षा दलाच्या सीआयबी शाखेचे जवान संजय पुरकाम, रजनलाल गुर्जर हे संत्रा मार्केटकडील रिझर्व्हेशन कार्यालयात ड्युटीवर होते.
तेवढ्यात त्यांना एकजण संशयास्पद स्थितीत तिकीट काढताना आढळला. तिकीट काढून तो बाहेर पडत असताना आरपीएफ जवानांनी त्यास रोखले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर त्यांनी त्यास चौकशीसाठी आरपीएफ ठाण्यात आणले.
जैनुद्दीन आबीदिन अब्दुल हमीद (४२) रा. मीठ कारखानाजवळ, गांजाखेत नागपूर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १६ तारखेचे अजमेरच्या प्रवासाची तिकिटे आणि २० तारखेची अजमेर ते नागपूर प्रवासाची ९ तिकिटे आढळली. जप्त करण्यात आलेल्या तिकिटांची किंमत १४ हजार २९५ रुपये आहे. त्याच्या विरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे अॅक्ट १४३ बी नुसार गुन्हा दाखल केला आहे. उद्या सोमवारी त्यास रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी १० हजार रुपये दंड किंवा ३ वर्षांची शिक्षा किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. (प्रतिनिधी)