सैन्य भरती प्रक्रिया आता आॅनलाईन
By Admin | Updated: July 9, 2015 02:52 IST2015-07-09T02:52:14+5:302015-07-09T02:52:14+5:30
भारतीय सैन्य दलात भरती संचालनालयाने दिल्ली मुख्यालयात भरतीसाठी आॅनलाईन नोंदणी करता यावी यासाठी ...

सैन्य भरती प्रक्रिया आता आॅनलाईन
नागपूर : भारतीय सैन्य दलात भरती संचालनालयाने दिल्ली मुख्यालयात भरतीसाठी आॅनलाईन नोंदणी करता यावी यासाठी वेबसाईट सुरू केली असून वेबसाईटवरील नोंदणीनुसार उमेदवारांना शारीरिक आणि इतर तपासण्यासाठी बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती आर्मी रिक्रूटमेंट आॅफिसचे संचालक कर्नल एम. के. जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना दिलेल्या तारखेच्या आधारे डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटजॉईन इंडियनआर्मीडॉटएनआयसीडॉटइन या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी लागणार आहे. भरतीची तारीख वेबसाईटवर टाकण्यात येईल. त्याबाबतची सूचना वृत्तपत्र, स्थानिक दूरचित्रवाहिन्या, जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे देण्यात येईल. आॅनलाईन नोंदणी भरतीच्या ४५ दिवसांपूर्वी सुरू करण्यात येईल. उमेदवार भरतीच्या वेबसाईटवर सायबर कॅफे, सामान्य सुविधा केंद्रातून नोंदणी करता येईल. आॅनलाईन नोंदणीसाठी उमेदवाराला आपल्या सोबत शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, स्वत:ची माहिती, निवासाचे प्रमाणपत्र, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे आणावी लागतील. उमेदवाराची आॅनलाईन नोंदणी यशस्वी झाल्यानंतर उमेदवाराला प्रवेशपत्र देण्यात येईल. नागपूर सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने जानेवारी २०१६ मध्ये सेना भरती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्हा वगळून सर्व जिल्ह्यातील उमेदवार भरती सुरू होण्याच्या ४५ दिवसांपूर्वी नोंदणी करू शकतील. उमेदवारांना आॅनलाईन नोंदणीत मदत हवी असल्यास सैन्य भरती कार्यालयात मदत मिळू शकणार असल्याचे कर्नल एम. के. जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सैन्य भरती कार्यालयाचे अश्वनी पांडे, विंग कमांडर तथा जनसंपर्क अधिकारी समीर गंगाखेडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)