रेल्वेस्थानकावर सशस्त्र बंदोबस्त
By Admin | Updated: December 7, 2015 06:42 IST2015-12-07T06:42:19+5:302015-12-07T06:42:19+5:30
उपराजधानीत ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांचा

रेल्वेस्थानकावर सशस्त्र बंदोबस्त
नागपूर : उपराजधानीत ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदुकधारी पोलीस अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या आमदार, मंत्र्यांसाठी सज्ज झाले असून मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
नागपुरात ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांचे नागपूर रेल्वेस्थानकावरील नेहमीचा ९० पोलिसांच्या बंदोबस्तासह लोहमार्ग पोलीस मुख्यालयातून ३० जणांचा अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे. शेगाव आणि मनमाड येथून दोन सहायक पोलीस निरीक्षक बंदोबस्तासाठी येणार आहेत. याशिवाय अश्रुधुराची अर्धी पार्टी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. पश्चिमेकडील भागात लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर दोन तंबू ठोकण्यात आले असून त्यात अधिवेशनासाठी विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे. अजनी रेल्वेस्थानकावरही मोर्चासाठी येणाऱ्या गर्दीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
आमदारांसाठी अतिरिक्त कोच
४सोमवारी सकाळी नागपुरात दाखल होणाऱ्या दुरांतो, विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये मुंबईवरून येणाऱ्या आमदारांसाठी विशेष कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी १२१०५ मुंबई-नागपूर विदर्भ एक्स्प्रेसमध्ये ए एक्स १ हा एसी टु टायरचा कोच अतिरिक्त कोच, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ई एक्स १ आणि ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये ए एक्स १ हा अतिरिक्त कोच लावला आहे.