चिमुकल्याच्या रडण्यावरून वाद, नराधम पतीने पत्नीची केली हत्या

By योगेश पांडे | Updated: September 21, 2023 23:59 IST2023-09-21T23:59:29+5:302023-09-21T23:59:59+5:30

नागपूर : भूक लागल्याने रडणाऱ्या पोटच्या पोराचा आवाज ऐकून संतप्त झालेल्या व्यक्तीने त्या मुद्द्यावरून पत्नीशी वाद घातला व त्यानंतर ...

Argument over the crying of a child, a murderous husband killed his wife | चिमुकल्याच्या रडण्यावरून वाद, नराधम पतीने पत्नीची केली हत्या

चिमुकल्याच्या रडण्यावरून वाद, नराधम पतीने पत्नीची केली हत्या

नागपूर : भूक लागल्याने रडणाऱ्या पोटच्या पोराचा आवाज ऐकून संतप्त झालेल्या व्यक्तीने त्या मुद्द्यावरून पत्नीशी वाद घातला व त्यानंतर तिची गळा चिरून हत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

बिस्ताबाई चंद्रदयाल मसकुले (२५) असे मृतक महिलेचे नाव असून चंद्रदयाल (२६) हा आरोपी पती आहे. हे दांपत्य मुळचे छत्तीसगडमधील असून प्रकाशनगर येथील एका निर्माणाधीन इमारतीत ते मजुर म्हणून कामाला होते. त्यांना तीन वर्षांचा लहान मुलगा आहे. त्या इमारतीत इतर मजुरदेखील राहतात.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रदयालच्या मुलाला भूक लागली व तो चिमुकला रडू लागला. त्याचा आवाज ऐकून चंद्रदयाल संतापला व त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. बिस्ताबाईने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे बोलणे ऐकून तो आणखी संतापला व भाजी कापण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत ती इमारतीतून बाहेर पडली व खाली कोसळली. आरडाओरड ऐकून इतर मजूर धावले. त्यांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी पतीला अटक केली.

Web Title: Argument over the crying of a child, a murderous husband killed his wife