ही खेळण्याची मैदाने आहेत की गुराढोरांचा गोठा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:28+5:302021-02-05T04:47:28+5:30
- प्रशासनाचे दुर्लक्ष : मोकाट कुत्र्यांमुळे चिमुकल्यांचे जीव धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रत्येक लहान-मोठ्या वस्त्यांमध्ये सार्वजनिक उपयोगाच्या ...

ही खेळण्याची मैदाने आहेत की गुराढोरांचा गोठा?
- प्रशासनाचे दुर्लक्ष : मोकाट कुत्र्यांमुळे चिमुकल्यांचे जीव धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक लहान-मोठ्या वस्त्यांमध्ये सार्वजनिक उपयोगाच्या जागेची योजना असते. परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार किंवा स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार तेथे देवालय, वाचनालय, पटांगण, बगीचे आदींचा विकास केला जातो. शहरात वस्त्या-वस्त्यांमध्ये अशा मोकळ्या स्पेस अनेक आहेत. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे ही ठिकाणे उपद्रवी तत्त्वांसोबतच गुराढोरांची स्थळेच जास्त झाली आहेत. कधी कधी तर ही मोकळी मैदाने गुराढोरांच्या राहण्याचे ठिकाण तर नाहीत ना, असा संशय निर्माण व्हायला लागतो.
हनुमाननगर येथील चौकोनी मैदानाला असेच स्वरूप प्राप्त झाले आहे. भरगच्च वस्ती असलेले हे मैदान उपद्रवी तत्त्वांनी ग्रासले होते. वस्तीतील नागरिकांनी त्याविरोधात आवाज उठविल्यावर प्रशासन जागे झाले आणि त्यांचा बंदोबस्त झाला. आता मात्र, तेथे मोकाट कुत्र्यांसोबतच गुराढोरांचा राबता असल्याचे दिसून येते. रात्रंदिवस ही जनावरे आपले बस्तान मांडून असतात. परिसरातील मुले खेळण्यासाठी आले की, येथील मोकाट कुत्री अंगावर येतात. परिसरातील काही मुलांना श्वानांनी चावाही घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बरेचदा वस्तीतील नागरिक रात्री-बेरात्री आपल्या कार्यस्थळावरून घरी येतात, तेव्हा हे श्वान त्यांच्या अंगावर तुटूनही पडत असतात. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्षच असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा स्थितीत मुलांनी खेळावे कुठे, हा प्रश्न उपस्थित होतो.
अशीच स्थिती शहरातील सर्वात मोठे मैदान असलेल्या रेशीमबाग मैदानावरही आहे. जिथे कुठे मैदानांना सुरक्षाभिंत नाही, अशा सर्व मैदानांमध्ये ही समस्या असून, परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
.........