मोठ्या प्रमाणात विक्री झालेले ग्रीन फटाके खरोखर ‘ग्रीन’ होते काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 07:00 IST2021-11-07T07:00:00+5:302021-11-07T07:00:07+5:30

Nagpur News दिवाळीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झालेले फटाके खरोखरच ग्रीन होते का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: वायू व ध्वनिप्रदूषणात वाढ नोंदविण्यात आल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Are the best-selling green firecrackers really 'green'? | मोठ्या प्रमाणात विक्री झालेले ग्रीन फटाके खरोखर ‘ग्रीन’ होते काय?

मोठ्या प्रमाणात विक्री झालेले ग्रीन फटाके खरोखर ‘ग्रीन’ होते काय?

ठळक मुद्देग्रीनचा लाेगाे लावून सामान्य फटाक्यांची विक्रीप्रशासनाचे नव्हते नियंत्रण

निशांत वानखेडे

नागपूर : फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनिप्रदूषण होत असल्याने पर्यावरणपूरक ‘ग्रीन क्रॅकर्स’ची संकल्पना पुढे आली. मात्र दिवाळीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झालेले फटाके खरोखरच ग्रीन होते का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: वायू व ध्वनिप्रदूषणात वाढ नोंदविण्यात आल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विक्री झालेल्या ग्रीन व सामान्य फटाक्यांचे कन्टेंट सारखेच असल्याने ग्रीन फटाके पर्यावरणपूरक कसे, हा सवाल आहे.

दिवाळी आली की दरवर्षी फटाक्यांमुळे प्रदूषण पसरत असल्याची ओरड होत असते. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(सीएसआयआर-नीरी)ने फटाक्यांमुळे प्रदूषणाची समस्या लक्षात घेता, एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या सहकार्याने ग्रीन फटाक्यांचा फाॅर्म्युला तयार केला होता. देशातील फटाका उत्पादक कंपन्यांशी करार करून ग्रीन फटाक्यांच्या निर्मितीला चालना दिली होती. बहुतेक शहरात प्रशासनाने केवळ ग्रीन फटाके फाेडण्यास मान्यता दिली हाेती. सामान्य फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण यामुळे नियंत्रित करणे आणि वातावरणात पसरणारे धुलिकण ३० टक्के कमी करता येईल, असा दावा नीरीने केला होता. मात्र ३० टक्के प्रदूषण रोखणे शक्य असल्याने उर्वरित ७० टक्केचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे या फटाक्यांना पर्यावरणपूरक कसे म्हणता येईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मग प्रदूषणात वाढ का झाली?

नागपूरपासून दिल्लीपर्यंत या दिवाळीत प्रदूषणात माेठी वाढ झाली. बहुतेक शहरात ग्रीन फटाके फाेडण्यास परवानगी हाेती. मग प्रदूषणात वाढ कशी झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नागपुरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५० ते ३०० एक्यूआयपर्यंत पाेहचला हाेता, जाे खराब स्तरात गणला जाताे.

कन्टेंट सारखेच, वेगळे कसे?

ग्रीन व्हिजिल संस्थेने नागपुरात सर्वेक्षण केले. कौस्तुभ चटर्जी यांनी सांगितले, ग्रीन फटाके व सामान्य फटाक्यांमधील कन्टेंट सारखेच असल्याचे आढळून आले. ग्रीनचा लोगो असलेल्या पॅकेट्सवर पोटॅशियम नायट्रेट, ॲल्युमिनियम, बेरियम नायट्रेट, डेक्स्ट्रीन, स्ट्रोन्टियम नायट्रेट हे रासायनिक कन्टेंट नमूद आहेत. सामान्य फटाक्यांमध्येही हेच कन्टेंट वापरण्यात येतात. फटाक्यांवरील क्यूआर कोडबाबतही संभ्रम दिसून आला. त्यामुळे ग्रीन व सीएसआयआर-नीरीच्या लोगोचा गैरवापर करून ग्रीन फटाक्यांच्या नावाने सामान्य फटाक्यांची विक्री करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. नीरीने सहकार्य केले नाही व प्रशासन नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: Are the best-selling green firecrackers really 'green'?