वाळू तस्करांना चाप
By Admin | Updated: November 23, 2014 00:33 IST2014-11-23T00:33:38+5:302014-11-23T00:33:38+5:30
पोलिसांनी आज पहाटे लाखोंची रेती तस्करी करणारे १४ ट्रक पकडले. दरम्यान, पहिल्या तीन-चार ट्रकचालकांची चौकशी सुरू करताच इतर ट्रकचालकांनी वाहने सोडून पळ काढला. हे रेती भरलेले ट्रक

वाळू तस्करांना चाप
परिमंडळ-१ ची कारवाई : १४ ट्रक पकडले
नागपूर : पोलिसांनी आज पहाटे लाखोंची रेती तस्करी करणारे १४ ट्रक पकडले. दरम्यान, पहिल्या तीन-चार ट्रकचालकांची चौकशी सुरू करताच इतर ट्रकचालकांनी वाहने सोडून पळ काढला. हे रेती भरलेले ट्रक परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने नंतर कळमना पोलिसांच्या हवाली केले. दुसऱ्या पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कळमन्यात येऊन ही कारवाई केल्यामुळे कळमना पोलिसांची रेतीमाफियांशी असलेली मैत्री उघड झाली आहे.
पोलिसांना तगडा हप्ता देऊन वाळू माफिया रोज लाखोंच्या रेतीची तस्करी करतात. कळमन्यातून रात्रभर शंभरावर ट्रक रेतीची वाहतूक होते. पोलिसांना त्यांचा हिस्सा रोजचा रोज (ज्या दिवशीचा त्याच दिवशी) मिळत असल्यामुळे, या रेती तस्करीकडे कळमन्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्याची माहिती कळाल्यामुळे परिमंडळ - १ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी रात्रपाळीतील अंबाझरीचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी, हवालदार राजू बावणे, सुरेश तालेवार तसेच एमआयडीसी ठाण्यातील सुनील मस्के, श्याम कडू, विनायक पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपरोक्त पोलिसांची दोन पथके पारडी नाक्यावर गेली. पहाटे ४.३० वाजता त्यांनी रेती भरून दिसलेले दोन टिप्पर आणि १२ ट्रक अशा १४ वाहनांची तपासणी सुरू केली.
पोलीस कारवाईची कल्पना येताच १४ पैकी अनेक वाहनचालक आपापली वाहने सोडून पळून गेले. पोलिसांनी ट्रक आणि रेती असा सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल कळमना पोलिसांच्या हवाली केला. (प्रतिनिधी)
कळमना पोलसांची संशयास्पद टाळाटाळ
दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करूनही कळमना पोलिसांनी आज सकाळपासून गुन्हे दाखल करण्यासाठी संशयास्पद टाळाटाळ केली. वाळू माफियांचे ‘सेटिंगबाज‘ कळमना पोलीस ठाण्याच्या परिसरात घुटमळत होते. त्यामुळे एकच गुन्हा दाखल करण्याचे ठरले होते. मात्र, १४ पैकी १२ वाहनचालकांकडे रेतीच्या वाहतुकीबाबत कसलीही कागदपत्रे न आढळल्यामुळे या १२ जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांनी कळमना पोलिसांना दिले.