सेंटर पॉईंट शाळेची मनमानी, तर भवन्सकडून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:22+5:302021-06-09T04:10:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पालकांना शहरातील भवन्स बी. पी. ...

Arbitrariness of Center Point School, consolation from Bhavans | सेंटर पॉईंट शाळेची मनमानी, तर भवन्सकडून दिलासा

सेंटर पॉईंट शाळेची मनमानी, तर भवन्सकडून दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पालकांना शहरातील भवन्स बी. पी. विद्यामंदिरने दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्कात २३ टक्के कपात करण्यात आली आहे, तर दुसरीकडे सेंटर पॉइंट स्कूलमध्ये शुल्कात प्रचंड वाढ करून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा प्रकार करण्यात आला आहे, असा दावा पालकांनी केला आहे.

सेंटर पॉइंट शाळेत अभ्यास करणाऱ्या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांच्या अडचणी मांडल्या. कोरोनाची स्थिती पाहता मागील वर्षभरापासून आम्ही शुल्क कमी करण्याची शाळा व्यवस्थापनाकडे मागणी करीत आहोत. मात्र, आमचे कुणीच ऐकत नाही. उलट पालकांना सातत्याने शुल्क भरण्यासाठी नोटिसीवर नोटीस पाठविल्या जात आहेत. जर त्यांनी शुल्क जमा केले नाही, तर मुलांची टीसी घरी पाठविण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. आर्थिक संकटांचा सामना करीत कसेबसे कुटुंब चालवत आहोत. आमची अडचण शाळा व्यवस्थापन समजून घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र असे झाले नाही, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

सेंटर पॉइंट शाळेकडून मागील सत्राचे पूर्ण शुल्क घेण्यात आले. नवीन शैक्षणिक सत्रात काही दिलासा देण्यात येईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, नेमके याच्या उलटे झाले. शाळा व्यवस्थापनाने १० टक्के शुल्कवाढ केली. पालकांच्या डोळ्यांत धूळ टाकण्यासाठी शाळेने शुल्काच्या एकूण मांडणीतून जिमखाना शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, टर्म शुल्क, आदी हटविले. मात्र, ट्युशन शुल्कात प्रचंड वाढ केली, अशी माहितीदेखील पालकांनी दिली.

प्राचार्यांकडून प्रतिक्रिया नाहीच

पालकांनी त्यांचे दावे खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी ‘लोकमत’ला सेंटर पॉइंट स्कूलच्या दाभा शाखेतील प्राथमिक इयत्तेत शिकणाऱ्या मुलांची २०२०-२१ व २०२१-२२ या सत्रांची शुल्क मांडणी पाठविली. यानुसार मागील शैक्षणिक सत्रात शाळेचे एकूण शुल्क एक लाख १२ हजार ७६० रुपये होते. या वर्षी अ‍ॅडमिशन शुल्क व ट्युशन शुल्क दोन्ही मिळून हा आकडा एक लाख ४६ हजार ४८० इतका झाला आहे. सेंटर पॉइंट शाळेच्या संकेतस्थळावर पहिली ते दहावीपर्यंतचे शुल्क तितकेच असल्याचे दिसून येते. पालकांच्या दाव्यासंदर्भात काटोल मार्ग शाखेच्या मुख्याध्यापिका शिल्पी गांगुली, दाभा शाखेच्या मुख्याध्यापिका राधिका मेहरा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. शिल्पी गांगुली यांना व्हॉटस‌्ॲपवर संदेश पाठवून प्रतिक्रियेबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी संदेश वाचला; मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. सेंटर पॉइंट स्कूलच्या वर्धमाननगर शाखेच्या मुख्याध्यापिका सुमती वेणुगोपालन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केले.

हा तर अन्यायच आहे

एक पालक डॉ. साबिर अली यांनी शाळेने १० टक्के शुल्कवाढ केल्याची बाब अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले. पालकांनी सातत्याने आवश्यक नसलेले शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. शाळेने शुल्क कमी करायला हवे होते, मात्र असे झाले नाही. पालकांबाबत शाळेची वागणूक योग्य नाही. अनेक दिवसांपासून पालक सातत्याने शाळेचे प्राचार्य व शिक्षकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना भेटण्यास नकार दिला जात आहे. शाळेत गेल्यावर पालकांना प्रवेशद्वारावरच थांबविले जात आहे.

लढा सुरू आहे

आम्ही मागील बऱ्याच कालावधीपासून अवाजवी शुल्काविरोधात लढा देत आहोत. मात्र, सेंटर पॉइंट स्कूल आमचे ऐकत नाही. आमच्याकडेदेखील अनेक पालकांच्या तक्रारी आल्या की, सेंटर पॉइंट शाळेने ३० ते ४० टक्के शुल्कवाढ केली आहे. हे अयोग्य आहे. शाळेने शुल्कामध्ये ६० टक्के कपात केली पाहिजे, असे प्रतिपादन पालकांचे संघटन असलेल्या राष्ट्रीय शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय संयोजक योगेश पाथरे यांनी केले.

पालकांचेच खर्च वाढले

शाळेपेक्षा अधिक खर्च पालक उचलत आहेत. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन होत आहेत. अशा स्थितीत मुलांसाठी पालकांना लॅपटॉप, संगणक विकत घेऊन द्यावे लागले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा नको म्हणून वायफाय कनेक्शनदेखील घेतले. त्याचे मासिक शुल्क वेगळे आहे. शिवाय घरांमध्ये विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त खर्च आला आहे. विजेचे बिलदेखील वाढले आहे. दुसरीकडे, शाळेचे खर्च तर कमी झाले आहेत. काही पालकांची तर दोन्ही मुले याच शाळेत शिकत आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च दुप्पट झाला आहे.

प्रयोगशाळा, संगणकाचे शुल्क का द्यायचे?

शुल्कासंदर्भात शाळा मनमानी करीत असल्याचा आरोप सेंटर पॉइंट शाळेच्या एका विद्यार्थ्याच्या आईने केला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ऑनलाईन अभ्यास सुरू असताना शुल्क कमी झालेच पाहिजे. विद्यार्थी शाळेचा स्विमिंग पूल, संगणक, वाचनालय, प्रयोगशाळा यांचा उपयोग करीत नसल्याने त्यांचे शुल्क का द्यायचे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Arbitrariness of Center Point School, consolation from Bhavans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.