महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता संपली!
By Admin | Updated: August 12, 2014 01:07 IST2014-08-12T01:07:45+5:302014-08-12T01:07:45+5:30
उपराजधानीची ओळखच नव्हे, तर वैभव असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची गत ३० एप्रिल रोजी मान्यता संपली आहे. मात्र असे असताना, गत तीन महिन्यांपासून महाराजबाग प्राणिसंग्रहालय

महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता संपली!
परवानगीची प्रतीक्षा : सीझेडएच्या प्रतिनिधीने दिली भेट
नागपूर : उपराजधानीची ओळखच नव्हे, तर वैभव असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची गत ३० एप्रिल रोजी मान्यता संपली आहे. मात्र असे असताना, गत तीन महिन्यांपासून महाराजबाग प्राणिसंग्रहालय विनापरवानगी सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोणत्याही प्राणिसंग्रहालयाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची (सीझेडए) मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी सीझेडएची चमू संबंधित प्राणिसंग्रहालयाचे निरीक्षण करून, पुढील मान्यता प्रदान करते. त्यानुसार महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला गत ३० एप्रिलपर्यंत मान्यता देण्यात आली होती. मात्र ती गत तीन महिन्यापूर्वीच संपली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे प्रतिनिधी ए. बी. श्रीवास्तव यांनी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन प्राणिसंग्रहालयाचे निरीक्षण केले. श्रीवास्तव सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास महाराजबागेत पोहोचले. यानंतर त्यांनी सायंकाळी ४ वाजतापर्यंत प्राणिसंग्रहालयातील व्यवस्थेची पाहणी करून, वन्यप्राण्यांसाठी उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
यानंतर सायं. ५ वाजताच्या सुमारास सिव्हिल लाईन्स येथील वन विभागाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी वन अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. माहिती सूत्रानुसार, सीझेडएने गत जून महिन्यात महाराजबाग प्रशासनाला एक पत्र जारी करून, त्यांची चमू निरीक्षणासाठी येणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे सतर्क झालेले महाराजबाग प्रशासन गत काही दिवसांपासून जोमाने कामाला लागले होते.
वर्षभर दुर्लक्षित राहणारे संपूर्ण प्राणिसंग्रहालय अचानक चकाचक झाले होते. यापूर्वी गत २०११ मध्ये सीझेडएचे सदस्य ब्रिजकिशोर गुप्ता व डॉ. डोगरा यांच्या चमूने महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन निरीक्षण केले होते. (प्रतिनिधी)
प्राणिसंग्रहालयाला मिळाल्या सूचना
यासंबंधी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वीरेंद्र गोंगे यांना विचारणा केली असता, त्यांनी सीझेडएचे प्रतिनिधी श्रीवास्तव यांनी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे दिवसभर निरीक्षण करून, काही सूचना केल्या असल्याचे सांगितले. तसेच प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेविषयी त्यांना विचारणा केली असता, गत एप्रिल किंवा मे महिन्यात ती संपली असल्याचे त्यांनी मान्य केले. दुसरीकडे श्रीवास्तव यांना प्राणिसंग्रहालयातील सोयीसुविधा व निरीक्षणाविषयी छेडले असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. निरीक्षणासंबंधीचा अहवाल लवकरच सीझेडएकडे सादर करणार असल्याचे ते म्हणाले.