सुधारित अध्यादेशाच्या प्रारूपाला मंजुरी
By Admin | Updated: August 14, 2014 01:17 IST2014-08-14T01:17:14+5:302014-08-14T01:17:14+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बंदीनंतरदेखील नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा २८ तारखेपासून घेण्यात येणार आहे. राज्यपाल कार्यालयाने या परीक्षेसाठी संबंधित

सुधारित अध्यादेशाच्या प्रारूपाला मंजुरी
नागपूर विद्यापीठ : विद्वत् परिषदेने दाखवली एकमताने हिरवी झेंडी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बंदीनंतरदेखील नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा २८ तारखेपासून घेण्यात येणार आहे. राज्यपाल कार्यालयाने या परीक्षेसाठी संबंधित अध्यादेशात काही बदल सुचवीत हिरवी झेंडी दिली होती. सुधारित अध्यादेशाच्या प्रारूपाला बुधवारी विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी घातलेल्या ६३ महाविद्यालयांनी प्रवेश दिलेल्या ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाने मंजुरी दिली. या अध्यादेशासंदर्भात राज्यपाल कार्यालयाने राज्य शासनाचा अभिप्राय मागितला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी अभिप्राय दिला होता.
विशेष परीक्षा घेण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सकारात्मकता दर्शवली. परंतु संबंधित अध्यादेशात सुधारणा करण्यात याव्यात अशी सूचनादेखील करण्यात आली होती. त्यानुसार राज्यपाल कार्यालयाने विशेष परीक्षा घेण्यास काहीच हरकत नसल्याचे कळविले होते. परंतु संबंधित परीक्षा काही अटींच्या आधारेच घेण्यात यावी अशी सूचनादेखील केली. त्यानुसार अध्यादेशाच्या प्रारूपात प्रशासनाने बदल केले व त्याला बुधवारी झालेल्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आले. विद्वत् परिषदेतील सदस्यांनी एकमताने याला मंजुरी दिली.
संबंधित सुधारित प्रारूप आता १९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या नियमित बैठकीत मांडण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)