गोरेवाडा प्राणिसंग्रहालयासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा
By Admin | Updated: July 7, 2015 02:34 IST2015-07-07T02:34:34+5:302015-07-07T02:34:34+5:30
उपराजधानीतील आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी त्वरित कालबद्ध कार्यक्रम आखून येथील सर्व रिक्त पदे एका महिन्याच्या आत तातडीने भरावी,...

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा
आढावा बैठक : वनमंत्री मुनगंटीवार यांच्या सूचना
नागपूर : उपराजधानीतील आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी त्वरित कालबद्ध कार्यक्रम आखून येथील सर्व रिक्त पदे एका महिन्याच्या आत तातडीने भरावी, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मुनगंटीवार यांनी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या बैठकीला वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)अनिल सक्सेना, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत व वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निगम प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान निगम यांनी वनमंत्र्यांसमक्ष गोरेवाडा प्रकल्पाचे विस्तृत सादरीकरण केले. ते म्हणाले, सुमारे १९१४ हेक्टर परिसरात हा प्रकल्प विकसित केला जात असून, ते आशिया खंडातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय राहणार आहे.
शिवाय येथील नाईट सफारी ही भारतातील पहिली संकल्पना राहणार आहे. सध्या येथे सुसज्ज रेस्क्यू सेंटर उभारण्यात आले असून, यात वन्यप्राण्यांवरील उपचारासह पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वन्यजीवांवर उपचार करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथे भारतीय सफारीसह आफ्रिकन सफारी व नाईट सफारी राहणार आहे.
यापैकी भारतीय सफारीचे काम सर्वप्रथम पूर्ण करावे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट करू न संग्रहालयाशी संबंधित महत्त्वाच्या कामांच्या निविदा तातडीने प्रकाशित कराव्या, पीपीपी मॉडेलमध्ये एकूणच कामकाज करावे, तसेच प्राणिसंग्रहालयासाठी प्राणी कुठून आणायचे याबाबतचा विस्तृत अहवाल तातडीने सादर करावा, असेही यावेळी मुनगंटीवार यांनी निर्देश दिले.(प्रतिनिधी)