Apply Seventh Pay Commission to Municipal Employees: Directions by Nana Patole | मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा : नाना पाटोले यांचे निर्देश

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा : नाना पाटोले यांचे निर्देश

ठळक मुद्दे४ फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया आदेश द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्वरित सातवा वेतन आयोग लागू करा, याबाबतची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करून ४ फेब्रुवारी २०२० पूर्वी यासंदर्भात आदेश देण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना दिले. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात नाना पाटोले यांनी सोमवारी मुंबई येथे नगरविकास विभाग, वित्त विभागाचे सचिव, महापालिका आयुक्त, शिक्षक व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती.
महापालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा, याकरिता मनपा शिक्षक संघाने तसेच राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसीएशन ( इंटक ) काँग्रेस या संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. दिवाळीपूर्वी महापालिका सभागृहाने व प्रशासनाने सातवा वेतन आयोग लावण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्य शासनाने २ ऑ गस्ट २०१९ रोजी एक परिपत्रक निर्गमित करीत सर्व महापालिकांना वेतन आयोग लावण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून मंजुरीची अट टाकण्यात आली. त्यामुळे माहे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मिळणारा सातवा वेतन आयोग प्रलंबित राहिला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात मनपा शिक्षक संघाने व राष्ट्रीय नागपुर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच अभिजीत वंजारी,गिरीश पांडव यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन यावर तात्काळ बैठक लावा, अशी मागणी केली. याची दखल घेत मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यावेळी नाना पटोले,अभिजीत वंजारी,गिरीश पांडव, महाराष्ट्राचे इंटकचे उपाध्यक्ष विनोद पटोले, महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, नगरविकास विभागाचे सहसचिव जाधव, वित्त विभागाचे सचिव साठे,नागपूर महापालिकेचे वित्त अधिकारी अनंता मडावी आदी उपस्थित होते.
शालार्थ प्रणालीत समाविष्ट शिक्षकांची पेन्शन प्रकरणे निकाली काढावीत, सहाव्या वेतन आयोगाचे ५९ महिन्याची देयके त्वरित जिल्हा परिषद पे युनिट यांना सादर करण्यात यावीत,आदीविषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शिष्टमंडळात काँग्रेस नेते अ‍ॅड.अभिजित वंजारी व गिरीश पांडव, महाराष्ट्राचे इंटकचे उपाध्यक्ष विनोद पटोले, मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह प्रमोद रेवतकर,संघाचे सचिव देवराव मांडवकर, दीपक सातपुते, राष्ट्रीय नागपूर कॉपोर्रेशन एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष संघटनेचे सुरेंद्र टिंगणे, रंजन नलोडे, ईश्वर मेश्राम,संजय मोहले, प्रवीण तंत्रपाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Web Title: Apply Seventh Pay Commission to Municipal Employees: Directions by Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.