अर्ज करा, प्रमाणपत्र घरपोच मिळवा

By Admin | Updated: April 19, 2017 02:40 IST2017-04-19T02:40:10+5:302017-04-19T02:40:10+5:30

जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलिअर, राष्ट्रीयत्व तसेच अधिवास प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आता माराव्या लागणाऱ्या चकरा लागत नाहीत.

Apply, get certificate home | अर्ज करा, प्रमाणपत्र घरपोच मिळवा

अर्ज करा, प्रमाणपत्र घरपोच मिळवा

जिल्हाधिकाऱ्यांनी राबविला राज्यातील पहिला प्रयोग : पोस्टाद्वारे लाभार्थ्यांना सात दिवसात प्रमाणपत्र
नागपूर : जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलिअर, राष्ट्रीयत्व तसेच अधिवास प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आता माराव्या लागणाऱ्या चकरा लागत नाहीत.
प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधीही आता सात दिवसावर आला आहे. नागपूर जिल्हाधिकारी यांनी सुरू केलेला पोस्ट सेवेद्वारा घरपोच प्रमाणपत्र देण्याचा राज्यातील पहिला प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे. गेल्या अडीच महिन्यात तब्बल ६ हजार ११ प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून घरपोच वितरण करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांपैकी जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलिअर, तसेच इतर प्रमाणपत्र तयार करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या सुमारे ६० टक्के असते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेशी संबंधित इतर महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येतात. कार्यालयात प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज सादर केल्यापासून सातत्याने चकरा माराव्या लागतात. हे प्रकार टाळण्यासाठी प्रमाणपत्रे घरपोच उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी प्रमाणपत्र घरपोच ही अभिनव संकल्पना सुरू केली आणि जनतेनेही या योजनेला दिलेल्या सहकायार्मुळे वेळेसोबतच पैशाचीही बचत झाली आहे.
जात प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केल्यानंतर किमान १५ ते ४५ दिवसाचा कालावधी अपेक्षित असतो. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी वारंवार जिल्हा कचेरीत यावे लागते. त्यामुळे लवकर काम व्हावे या दृष्टीने मध्यस्थांचेही सहकार्य घेण्याची प्रवृत्ती वाढत जाते. यामध्ये अर्जदाराला शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त अधिकचे पैसे सुध्दा मोजावे लागतात. या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी अधिकाऱ्यांंसोबत प्रमाणपत्र वितरणामध्ये सुलभता व सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेतला. सात दिवसात घरपोच प्रमाणपत्र देण्यासाठी भारतीय पोस्ट सेवेचे या योजनेसाठी सहकार्य घेऊन थेट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत प्रमाणपत्र वितरित करताना प्रमाणपत्र तयार होण्यापासून तर प्रत्यक्ष हातात पडेपर्यंतची संपूर्ण कार्यवाही संदर्भात एसएमएसद्वारा माहिती उपलब्ध करून दिल्यामुळे ही योजना अधिक लोकाभिमुख ठरली आहे.(प्रतिनिधी)

३० रुपयात मिंळते प्रमाणपत्र
जनतेला सुलभ तसेच जलदसेवा उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. प्रारंभी पोस्ट सेवा विभागाची ही सेवा कशी संलग्न करता येईल आणि शुल्क आकारण्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर केवळ ३० रुपयामध्ये नागपूर शहरात अर्जदाराच्या विनंतीनुसार प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच महिन्यात १५०५ प्रमाणपत्राचे वितरण झाले. त्यानंतर मार्च महिन्यात ३५७५ तर ११ एप्रिलपर्यंत १०३१ प्रमाणपत्र घरपोच सेवेद्वारे वितरित करण्यात आले आहेत. नागपूर शहराच्या बाहेर अथवा अर्जदाराच्या मागणीनुसार प्रमाणपत्र पाठविण्याची व्यवस्था सेतू केंद्रामार्फत करण्यात आली आहे.

अशी होते प्रक्रिया
प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर झाल्यानंतर या अर्जावर तीन दिवसात निर्णय घेण्यात येऊन प्रमाणपत्र तयार करण्यात येते. त्यानंतर ४८ तासात पोस्टाद्वारे लाभार्थ्याच्या घरापर्यंत प्रमाणपत्र पोहचविण्याची व्यवस्था पोस्ट विभागातर्फे करण्यात येते. अर्जामध्ये त्रुटी किंवा दस्तऐवजाची आवश्यकता असल्यास संबंधित लाभार्थ्यांना एसएमएस करून अर्जाची पूर्तता करण्यासाठी एसएमएस पध्दतीचा वापर करण्यात येतो. दैनंदिन येणाऱ्या अर्जांची छाननी करण्यासाठी तीन कर्मचारी तसेच तीन तहसीलदार व नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर दररोज दोन उपजिल्हाधिकारी प्राप्त झालेल्या अर्जानुसार प्रमाणपत्रावर अंतिम निर्णय घेऊन प्रमाणपत्र वितरित करतात. या संपूर्ण प्रक्रियेवर संनियंत्रक म्हणून उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाय यांची नियुक्त करण्यात आली आहे. सेतूचे द्वारमवार हे अर्ज मिळण्यापासून पोस्ट विभागाच्या प्रक्रियेत सहभागी आहेत.

जिल्हाधिकारी घेतात दररोज आढावा
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली असून घरपोच प्रमाणपत्र उपलब्ध करून देणारा नागपूर जिल्हा हा पथदर्शी ठरला आहे. या संपूर्ण उपक्रमाची नियोजन तसेच दैनंदिन तपासणी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्यामुळे जनतेलाही सहज व सुलभपणे प्रमाणपत्र मिळत आहेत.

Web Title: Apply, get certificate home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.