नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी ४६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मागील प्रक्रियेचा अनुभव लक्षात घेता यंदा तरी विद्यापीठाला पूर्णकालीन कुलसचिव मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डॉ. पूरण मेश्राम यांच्यानंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळालेले नाहीत. डॉ. निरज खटी यांच्याकडे प्रभारी जबाबदारी होती. त्यानंतर विद्यापीठाला विचारात न घेता राज्य शासनाने डॉ. अनिल हिरेखन यांची या पदावर नियुक्ती केली. विद्यापीठाने राज्याकडे पदभरती करण्याचा आग्रह धरता होता. त्यानुसार मार्च महिन्यात राज्य सरकारने पदासाठी परवानगी दिली. त्यानंतर पद मान्यतेसाठी उच्च शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. विभागाने २६ एप्रिलला याबाबत परवानगी दिली. त्यानुसार २८ एप्रिलला कुलसचिव व चार अधिष्ठाता पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली. २१ मेपर्यंत विद्यापीठाकडे ४६ जणांनी अर्ज केले. अर्ज करणाऱ्यांमध्ये विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया होईल व पात्र उमेदवारांच्या मुलाखती होतील.