Application for registration of case against Vijay Vadettiwar | विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी अर्ज

विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी अर्ज

ठळक मुद्देनागपूर पोलीस आयुक्त, गडचिरोली पोलीस अधीक्षकांना नोटीस

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : नेहा मितेश भांगडिया व इतर सहा जणांना गडचिरोली येथील सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळाच्या विश्वस्तपदावरून कमी करण्यासाठी खोटे राजीनामे व प्रतिज्ञापत्रे तयार केल्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह १२ व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागपूर पोलीस आयुक्त, गडचिरोली पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस निरीक्षक आणि वडेट्टीवार यांच्यासह संबंधित १२ व्यक्तींना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

अर्जावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नेहा भांगडिया व इतर सहा जणांनी हा अर्ज दाखल केला आहे. वडेट्टीवार व इतर १२ व्यक्तींनी मंडळावर नवीन विश्वस्त नियुक्त करण्यासाठी अर्जदारांचे खोटे राजीनामे व प्रतिज्ञापत्रे तयारी केली. तसेच, त्यावर अर्जदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या आणि संबंधित राजीनामे व प्रतिज्ञापत्रे सहायक धर्मादाय आयुक्तांकडे सादर केले. त्यासंदर्भात अर्जदारांनी नागपूर पोलीस आयुक्त, गडचिरोली पोलीस अधीक्षक व गडचिरोली पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. अर्जदारांच्या वतीने ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Application for registration of case against Vijay Vadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.