विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन : आॅरेंज अॅण्ड कॉटन बिल्डकॉनचा आठवा वर्धापनदिन
By Admin | Updated: July 9, 2015 03:07 IST2015-07-09T03:07:27+5:302015-07-09T03:07:27+5:30
नागपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून नागपूरकरांना प्रचंड अपेक्षा आहेत. शहराचे योग्य नियोजन करून ...

विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन : आॅरेंज अॅण्ड कॉटन बिल्डकॉनचा आठवा वर्धापनदिन
लोकांना स्वस्तात घरे उपलब्ध करून द्यावीत
नागपूर : नागपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून नागपूरकरांना प्रचंड अपेक्षा आहेत. शहराचे योग्य नियोजन करून तसेच बांधकाम व्यावसायिकांना शासकीय पातळीवर होणारा नाहक त्रास दूर करून येथील नागरिकांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.
आॅरेंज अॅड कॉटन बिल्डकॉन प्रा.लि.चा आठवा वर्धापनदिन मंगळवारी रात्री उत्साहात पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून विजय दर्डा बोलत होते. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात चित्रकार प्रमोद रामटेके, ‘वेद’ चे सचिव राहुल उपगन्लावार, बिल्डर राजू कुणावार, शिरीष रामापुरे, आॅरेंज अॅड कॉटन बिल्डकॉन प्रा.लि.चे संचालक सुदत्ता रामटेके आणि भूपेश वाघमारे उपस्थित होते.
विजय दर्डा म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचे खाते आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. हे दोन्ही लोकप्रतिनिधी विदर्भाचे सुपुत्र आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या शहराचे मॅपिंग झाले पाहिजे. लोकांना स्वस्त घरे कशी मिळतील, त्याचा विचार केला पाहिजे. आज नागपूर सुधार प्रन्यासला भरमसाठ फी द्यावी लागते. बिल्डिंगचा नकाशा मंजूर करण्यासाठी २४ टेबलावरून जावे लागते. भ्रष्टाचार बोकाळला असून एका बिल्डिंगचा नकाशा आणि इतर परवानग्यांसाठी २५ लाख रुपयांची लाच द्यावी लागते. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे निर्मुलन आणि लोकांना स्वस्ते घरे उपलब्ध करून दिली पाहिजे, असे दर्डा म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या धर्तीवर शहराचा प्लॅन तयार करून व्हर्टिकल विकास आणि वाढीव एफएसआय द्यावा, अशी मागणी दर्डा यांनी यावेळी केली. मेट्रो रिजनमध्ये विकासासाठी जास्त पैसा लागतो, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असेही आवाहन खा. दर्डा यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)