जन्मठेपेविरुद्धचे अपील फेटाळले
By Admin | Updated: September 5, 2016 02:36 IST2016-09-05T02:36:40+5:302016-09-05T02:36:40+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उमरेड येथील हत्याप्रकरणात आरोपीचे जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून लावले आहे.

जन्मठेपेविरुद्धचे अपील फेटाळले
हायकोर्ट : डोक्यावर दगड टाकून हत्या
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उमरेड येथील हत्याप्रकरणात आरोपीचे जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून लावले आहे.
कमलाकर गोमा चौधरी (४५) असे आरोपीचे नाव असून तो उमरेड येथील रहिवासी आहे. मृताचे नाव महादेव बनकर होते. २७ जून २०१२ रोजी मध्यरात्री महादेव झोपलेला असताना आरोपीने त्याच्या डोक्यावर दगड टाकला. यामुळे महादेव गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाला. नागपूर सत्र न्यायालयाने २ मार्च २०१३ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
पोलिसांनी आरोपीची पत्नी देवकाबाई व मुलगा किसन यांच्याविरुद्धही दोषारोपपत्र दाखल केले होते.
सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले होते. शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)