अपंग लक्ष्मीची भरारी

By Admin | Updated: June 19, 2014 01:01 IST2014-06-19T01:01:44+5:302014-06-19T01:01:44+5:30

जन्मापासूनच एका हाताने अपंग. शिवाय घरी अठरा विश्वे दारिद्र्य . त्यामुळे गत पाच वर्षांपूर्वी आईवडिलांनी तिला होम फॉर एजेड अ‍ॅण्ड हॅण्डिकॅप्ट संस्थेच्या वसतिगृहात आणून सोडले. अमरावती जिल्ह्याती

Apang Lakshmi's fare | अपंग लक्ष्मीची भरारी

अपंग लक्ष्मीची भरारी

गरीब शेतकऱ्याच्या मुलीचे यश
नागपूर : जन्मापासूनच एका हाताने अपंग. शिवाय घरी अठरा विश्वे दारिद्र्य . त्यामुळे गत पाच वर्षांपूर्वी आईवडिलांनी तिला होम फॉर एजेड अ‍ॅण्ड हॅण्डिकॅप्ट संस्थेच्या वसतिगृहात आणून सोडले. अमरावती जिल्ह्यातील खानापूर या छोट्याशा गावातून आलेल्या लक्ष्मी पिल्लेवान हिने कठोर परिश्रम व जिद्दीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत ६६.२० टक्के गुण संपादन केले. एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीसाठी हे सुयश नक्कीच मेरिटपेक्षा अधिक आहे.
तिला एकच हात असल्याने बालपणी तिला रांगता येत नव्हते. मात्र तिने हार मानली नाही. ती थेट उभे होण्यास शिकली.
तिची ती जिद्द पाहून आईवडिलांना हिंमत आली. मुलगी अपंग असल्याने आईवडिलांना चिंतेत टाकले होते. परंतु लक्ष्मीने पहिल्याच वर्गात प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर चौथीपर्यंत सतत पहिला क्रमांक मिळवित गेली. यानंतर ती होम फॉर एजेड अ‍ॅण्ड हॅण्डिकॅप्ट संस्थेच्या वसतिगृहात पोहोचली.
गत पाच वर्षांपासून ती येथेच राहत आहे. लक्ष्मीला भविष्यात वकील बनायचे आहे. सध्या समाजात रोज घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी तिला कमालीचे व्यथित केले आहे. त्यामुळे मोठे होऊन अशा घटनांमधील पीडित महिलांना न्याय मिळवून देणे, हा आपला उद्देश राहणार असल्याचे यावेळी ती म्हणाली. साधारण दहावीची परीक्षा आटोपताच अनेक विद्यार्थी पालकांसह सहलीचा आनंद लुटण्यासाठी जातात. मात्र लक्ष्मीने दहावीची परीक्षा होताच, कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. यातून शिक्षणाविषयी तिचे प्रेम व जिद्दीचा परिचय मिळतो. खरोखरच लक्ष्मीच्या या जिद्दीचे प्रेरणाच घ्यायला हवी.
चिंता मिटली
लक्ष्मीने दहावीत प्राप्त केलेल्या यशामुळे तिच्या भविष्याविषयी वाटत असलेली सर्व चिंता मिटल्याचे समाधान यावेळी लक्ष्मीचे वडील भगवान पिल्लेवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. पिल्लेवान यांना चार मुली आहेत. परंतु लक्ष्मी अपंग असल्याने तिच्यावर सर्वांधिक जीव. ती शिकून आपल्या पायावर उभी व्हावी, एवढेच स्वप्न असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Apang Lakshmi's fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.