विदर्भवादी शहांवर नाराज
By Admin | Updated: May 28, 2015 02:16 IST2015-05-28T02:16:50+5:302015-05-28T02:16:50+5:30
‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कुणाला दिला नव्हता, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी करून विदर्भवाद्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.

विदर्भवादी शहांवर नाराज
भाजपविरोधी सूर : गडकरी, फडणवीस यांनी द्यावे स्पष्टीकरण
नागपूर : ‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कुणाला दिला नव्हता, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी करून विदर्भवाद्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत वेगळ्या विदर्भाचा ठराव घेणाऱ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष अशी भूमिका कशी काय घेऊ शकतो, यावर आश्चर्य व्यक्त करीत स्थानिक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे.
शहांना विदर्भाची आंदोलने माहीत नाहीत का?
भाजपने १९९७ मध्ये विदर्भ राज्य व्हावा, असा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर केला. तो ठराव त्यांना बंधनकारक आहे. भाजपने स्वत: लहान राज्ये निर्माण केली आहेत. अशा परिस्थितीत शहा यांनी असे वक्तव्य करणे हे भाजपच्या ठरावाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. ते अक्षम्य आहे. कोल्हापूरच्या राज्य अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ राज्य निर्मितीचा उल्लेख केला. तेथे अमित शहा उपस्थित होते. गडकरी व फडणवीस यांनी विदर्भाचा पुरस्कार केला, आंदोलने केली. हे सर्व शहा यांना माहीत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. विदर्भात सार्वमत घेतले असता ९६ टक्के नागरिकांनी विदर्भाच्या बाजूने कौल दिला. एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष जनमताचा आदर करीत नसेल तर हे दुर्दैवी आहे. भाजपला समर्थन देणाऱ्या वैदर्भीय मंचांनी शहा यांच्या या भूमिकेचा गांभीर्याने विचार करावा.
- डॉ. श्रीनिवास खांदेवाले , अर्थतज्ज्ञ
गडकरी- फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी
अमित शहा यांनी विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन दिलेच नाही, असे सांगून विदर्भातील जनतेची फसवणूक केली आहे. आजवर विदर्भासाठी झालेल्या आंदोलनांचा हा अपमान आहे. भाजपच्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीत वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत करण्यात आला होता. तेव्हा अमित शहा कुठे होते हे माहीत नाही, पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी विदर्भाबाबत घूमजाव करून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही कोंडी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भासाठी रस्त्यावर येऊन आंदोलने केली आहेत. आपल्याला महाराष्ट्रापेक्षा विदर्भाचा मुख्यमंत्री होणे आवडेल, अशी वक्तव्ये केली आहेत. शहा यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.
- राम नेवले, विदर्भ राज्य आंदोलन समिती
शहांच्या वक्तव्याचे आश्चर्य
शहा यांनी मांडलेली विदर्भाबाबतची भूमिका ही भाजपची असू शकत नाही. भाजपने विदर्भासाठी जागर यात्रा काढली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही भाजपने वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केला होता. आता शहा यांनी भूमिका बदलली याचे आश्चर्य वाटते. शहा यांची बदलती भूमिका भाजपसाठी नुकसानकारक ठरेल.
-अॅड. नंदा पराते,
अध्यक्ष, आदिम