चिंता वाढली; नागपूर जिल्ह्यात नव्या बाधितांचा आकडा तीन हजारपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 20:25 IST2022-01-19T20:23:47+5:302022-01-19T20:25:12+5:30
Nagpur News कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग आणखी वाढत असल्याचे चित्र असून बुधवारी नागपूर जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक नवे बाधित आढळले.

चिंता वाढली; नागपूर जिल्ह्यात नव्या बाधितांचा आकडा तीन हजारपार
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग आणखी वाढत असल्याचे चित्र असून बुधवारी जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक नवे बाधित आढळले. याशिवाय २४ तासात पाच जणांचा मृत्यू झाला. या आकडेवारीमुळे सामान्य जनता सोबतच प्रशासनाला धडकी भरली असून ही निश्चितच चिंता वाढविणारी बाब आहे.
बुधवारी जारी झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल ३ हजार २९६ नवे कोरोनाबाधित आढळले. नागपुर शहरात २ हजार ६७६ तर ग्रामीणमध्ये ५२९ बाधित सापडले. ९१ बाधित जिल्ह्याबाहेरील आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या ५ लाख १७ हजार २२६ इतकी झाली आहे. बुधवारी शहरात चार तर जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा १० हजार १४१ वर पोहोचला आहे. बुधवारी १२ हजार ५८९ चाचण्या झाल्या. त्यातील ९ हजार ६५५ शहरात व २ हजार ९३४ चाचण्या ग्रामीणमध्ये झाल्या.
१६ हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण
सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. बुधवारी जिल्ह्यात १६ हजार २४२ सक्रिय रुग्ण होते. त्यातील १३ हजार १३३ रुग्ण शहरात तर २ हजार ९३९ ग्रामीण भागात आहेत. २४ तासांत १ हजार ३४५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४ लाख ९० हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. १२ हजार २ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर उर्वरित रुग्ण शासकीय-खासगी दवाखाने तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत.