...अन् तो राष्ट्रध्वज जप्त झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:46 IST2021-02-05T04:46:44+5:302021-02-05T04:46:44+5:30
नागपूर : ही घटना तब्बल २० वर्षांपूर्वीची आहे. त्या दिवशी काही नागरिकांनी डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसरात बेकायदेशीररित्या प्रवेश ...

...अन् तो राष्ट्रध्वज जप्त झाला
नागपूर : ही घटना तब्बल २० वर्षांपूर्वीची आहे. त्या दिवशी काही नागरिकांनी डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसरात बेकायदेशीररित्या प्रवेश करून राष्ट्रध्वज फडकावला. दरम्यान, वादावादी होऊन प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले अन् पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासोबत राष्ट्रध्वजही जप्त केला. २६ जानेवारी असल्यामुळे ही घटना नव्याने चर्चेत आली.
ही घटना २६ जानेवारी २००१ रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. काही नागरिक चार गाड्यांनी डॉ. हेडगेवार स्मारक समितीजवळ पोहोचले. दरम्यान, त्यांनी ‘पहले तिरंगा, बाद मे रंग बिरंगा’ अशा घोषणा देत समितीच्या परिसरात प्रवेश करून राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर समितीचे व्यवस्थापक सुनील कथले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संबंधित नागरिकांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली. ठार मारण्याच्या धमकी दिली, असे गंभीर आरोप केले. त्यावरून विजय रमेश कळंबे, उत्तम जंगलू मेंढे, दिलीप गोपीचंद छत्तानी यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४८, ४४८, ३२३, ५०४, ५०६-ब, १४९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला तसेच, राष्ट्रध्वज जप्त करण्यात आला.
------------
राष्ट्रध्वज जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा आदेश
या प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला चालला. ६ ऑगस्ट २०१३ रोजी न्या. आर. आर. लोहिया यांनी सरकार पक्षाला आरोपींविरुद्ध गुन्हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचा निष्कर्ष नाेंदवून आरोपींना संशयाचा लाभ देत निर्दोष मुक्त केले तसेच, प्रकरणाचा अपील कालावधी संपल्यानंतर जप्त राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक जतन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात यावा, असा आदेश दिला.
------------
राष्ट्रध्वज मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाल येथील मोहनीश जबलपुरे यांनी हा राष्ट्रध्वज त्यांना मिळावा याकरिता २१ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. तो राष्ट्रध्वज मला देण्यात यावा, राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक जतन करून ठेवेल आणि १५ ऑगस्ट व २६ जानेवारील सार्वजनिक ठिकाणी तो राष्ट्रध्वज आदरपूर्वक फडकावेन, असे जबलपुरे यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या निवेदनावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.